मुंबई: मुंबईची मुख्य ओळख असलेल्या मरिन ड्राईव्हवर सध्या काही कामासाठी बरीच तोडफोड करण्यात आली आहे. मुंबईचा क्वीन नेकलेस अशी ओळख असलेल्या ऐतिहासिक मरिन ड्राईव्हवर काही भाग तोडला आहे. यावरुन भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.
शेलार यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, केंद्रातील भाजप सरकारने वीज बचत व्हावी व पर्यावरण पुरक म्हणून मुंबईत एलईडी दिवे लावण्यास सुरुवात केली तेव्हा क्वीन नेकलेसची शोभा जाईल अशी ओरड करण्यात आली होती. हे जे ओरडत होते त्यांनी क्वीन नेकलेसच आता तोडला त्याचे काय? असा सवाल करत हा दुटप्पीपणा, ढोंगीपणा असल्याचा आरोप शेलार यांनी केला आहे.
शेलार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, केंद्र सरकारच्या पुढाकाराने पर्यावरण पुरक एलईडी दिवे मुंबईत लावले गेले. तेव्हा काही जणांनी मरिन ड्राईव्ह, क्वीन नेकलेसची शोभा जाईल म्हणून केवढा थयथयाट केला. अखेर झाले काय? तर शोभा वाढलीच! पण..आता क्वीन नेकलेसची माळ हे तोडूच टाकत आहेत, क्वीन नेकलेसच राहणार नाही त्याचे काय? आता पारसी गेट तोडलाच. समुद्रात अधिकचा भराव टाकून ती जागा पण खाणार. परिसराची शोभा घालवणार. आता हे तुम्ही करताय ते पुण्य? आम्ही पर्यावरण पुरक दिवे लावले ते पाप? झाला ना तुमचा दुटप्पीपणा, मुंबईचे बेगडी प्रेम उघड? मरिन ड्राईव्हच्या किनाऱ्याला तुमच्या "ढोंगीपणाचा गाळ" दिसला ना अशा शब्दांत त्यांनी टीका केली आहे.
मुंबई महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी अशा कोस्टल रोडचे काम गिरगाव येथे चौपाटीजवळ सुरू आहे. या कामासाठी मरिन ड्राईव्हवर सध्या बरीच तोडफोड करण्यात आली आहे.