मुंबई : पुण्यातील अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा तपास आता पुणे क्राईम ब्रान्च करणार असल्याची माहिती पुणे पोलिसांनी मुंबई उच्च न्यायालयात दिली. तसंच या प्रकरणाचा तपास करणाऱ्या संबंधित तपास अधिकाऱ्याची पोलिस उपायुक्तांमार्फत चौकशी करणार असून यात पोलिस अधिकारी दोषी आढल्यास त्याच्यावरही कारवाई करणार, अशी माहितीही पुण्याचे सहआयुक्त रवींद्र कदम यांनी हायकोर्टात उपस्थित राहून दिली.


न्यायमूर्ती शाहरुख काथावाला आणि न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्या खंडपीठासमोर शनिवारी यावर सुनावणी झाली. हायकोर्टाने 5 जूनपर्यंत पुणे पोलिसांना तपासाच्या प्रगतीचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.







आपल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा ठावठिकाणा शोधण्यासाठी पुणे पोलिसांकडून काही प्रयत्न होत नसल्याचं पाहून, कुटुंबीयांनी अखेरीस 15 मे रोजी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या प्रकरणातील मुख्य आरोपी हा पुण्यातील नामचीन गुंड श्वेतांग निकाळजे उर्फ श्वेत्या असून त्याच्याविरोधात पुणे सत्र न्यायालयात गोळीबार करणं, हत्येचा प्रयत्न, दरोडा, एटीएम फोडी असे अनेक गुन्हे दाखल आहेत. तसंच त्याच्यावरील राजकीय वरदहस्तामुळे पोलिस कारवाई करण्यास टाळाटाळ

करत आहेत, असा आरोप कुटुंबीयांनी हायकोर्टात केला आहे.



17 वर्ष आणि 10 महिन्यांची ही अल्पवयीन मुलगी एप्रिल 2018 पासून बेपत्ता आहे. याविषयी तिच्या कुटुंबीयांनी पुण्यातील फरासखाना पोलिसांत तक्रार दिली होती. त्यानंतर अपहृत मुलीच्याच मोबाईलवरुन तिच्या भावाला कॉल आला. मात्र, त्यावरुन मुलगी बोलत नव्हती. ‘तुझी बहीण माझ्यासोबत आहे आणि मी तिच्याशी लवकरच लग्न करणार आहे. तू किंवा तुझ्या कुटुंबातील कोणीही पोलिसांत तक्रार दिली तर तुझ्या संपूर्ण कुटुंबाला संपवून टाकेन’, अशी धमकी एका तरुणाने मुलीच्या भावाला दिली.


यासंदर्भात  कुटुंबियांनी पोलिसांत त्यांच्यात गल्लीत राहणाऱ्या तरुणाविरोधात एफआयआर नोंदवला. मात्र, ‘पोलिसांनी एफआयआरमध्ये मुलीच्या अपहरणाची तारीख चुकीची नोंदवली आणि मुलीचे त्या मुलाशी प्रेमसंबंध आहेत, अशी नोंद केली’, असा कुटुंबीयांचा आरोप आहे.