मुंबई : मंत्रालयाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. शेतकरी सुभाष जाधव यांनी 20 तारखेला विष पिऊन मंत्रालयासमोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. शेतकरी सुभाष जाधव यांनी मुलांच्या शिक्षणासाठी गावातला सावकार विलास साधू शिंदे आणि सुशीला सुरेश जाधव यांच्याकडून पाच लाख रुपये पाच टक्के व्याज दराने कर्ज घेतले होते. मात्र हे पैसे सावकार विलास शिंदे यांना न दिल्यामुळे त्यांनी सुभाष जाधव यांच्या घराची तोडफोड केली होते आणि कुटुंबासोबत मारहाण केली होती.



यासंदर्भात शेतकरी सुभाष जाधव यांनी स्थानिक मंचर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. मात्र पोलिसांनी कारवाई न केल्यामुळे शेतकरी सुभाष जाधव यांनी 20 ऑगस्टला मंत्रालयात येऊन मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना भेटण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र मंत्रालयाबाहेर सुरक्षारक्षकांनी आत मध्ये प्रवेश न दिल्यामुळे शेतकरी सुभाष जाधव यांनी अशा पद्धतीचे  टोकाचं पाऊल उचलले होते. सध्या मध्यरात्री मरिन ड्राईव्ह पोलिसांनी सुभाष जाधव यांचा मुलगा गणेश सुभाष जाधव याच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करून पुण्यात मंचर पोलिसांना ट्रान्सफर केले आहेत.  यासंदर्भात अधिक चौकशी मंचर पोलीस करणार आहेत. 



या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ जाधव यांना उपचारासाठी जीटी रुणालयात दाखल केलं होतं. जाधव हे आंबेगाव तालुक्यातील जाधववाडी येथील रहिवाशी आहेत. अनेकदा मंत्रालयात येऊन न्याय मागितला. पण न्याय मिळाला नाही, असं त्यांनी म्हटलं होतं. काही वर्षांपूर्वी धर्मा पाटील या शेतकऱ्याने अशाच प्रकारे मंत्रालयात विष घेऊन आपलं जीवन संपवलं होतं. यानंतर आता या दुसऱ्या घटनेनं पुन्हा मंत्रालय आणि प्रशासन हादरुन गेलं आहे. विशेष म्हणजे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघातील हा शेतकरी असून आता या घटनेनंतर ते काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.