मुंबई : पुण्यातील  मुठा कालवा तेथे बेकायदेशीरपणे राहणाऱ्या लोकांमुळेच फुटला असा दावा कृष्णाखोरे विकास महामंडळानं शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात केला. या कालव्याशेजारी बेकायदेशीर वस्ती उभी राहिल्यानं अधिकाऱ्यांना वेळोवेळी कालव्याची तपासणी करण्यात अनेक अडचणी निर्माण झाल्या.


शेती आणि पिण्यासाठी वापर होत असल्यानं हा कालवा 12 महिने वाहता होता, तो बंद करणं शक्य नव्हतं. त्यामुळे सदैव वाहणाऱ्या कालव्यातून सर्रासपणे बेकायदेशीर वस्त्यांना फुकट पाणीपुरवठा उपलब्ध झाला. तसेच कालव्याशेजारीच कचरा टाकला गेल्यानं तिथं घुशी लागल्या, ज्यानं जमीन भुसभुशीत होत गेली. असा दावा कृष्णाखोरे विकास मंडळाकडून हायकोर्टात करण्यात आला आहे.

त्याचबरोबर या दुर्घटनेत बाधित झालेल्या 98 कुटुंबियांपैकी सध्याच्या सर्वेक्षणानुसार केवळ 40 कुटुंब ही नुकसान भरपाईस पात्र असल्याची माहिती पुणे महानगरपालिकेनं हायकोर्टात दिली.

पुण्यातील खडकवासला धरणातून निघणारा मुठा नदीच्या या कालव्याची एकूण लांबी ही जवळपास 220 किमी. इतकी आहे. ज्यापैकी 24 किमी. चा कालवा पुणे शहरातून जातो. मात्र या कालव्याला खेटून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वस्त्या उभ्या राहिल्या आहेत. सिंहगड रोडनजीकच्या भागात 27 सप्टेंबरच्या सकाळी अचानक घडलेल्या या दुर्घटनेत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही.

परंतु या दुर्घटनेत सुमारे 980 जण बेघर झाले आहेत. वस्तीत घुसलेल्या पाण्याचा जोर इतका होता की, अनेकांचे संसार वाहून गेले. या दुर्घटनेतील पीडितांना 3 कोटी रुपयांचा मदतनिधी मंजूर झाल्याची माहिती राज्य सरकारने हायकोर्टात दिली.

एका कुटुंबाला 95 हजारांपर्यंतची मदत रोख रकमेत दिली जाणार असल्याची माहीती सरकारी वकिलांनी हायकोर्टात दिली. या दुर्घटनेसंदर्भात अॅडव्होकेट असिम सरोदे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. हायकोर्टाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती गिरीष कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी सुरू आहे.

संबंधित बातम्या

केबल्समुळे मुठा कालव्याची भिंत फुटल्याचा अंदाज

मुठा कालवा भगदाड : मुलाच्या शिक्षणासाठीचे पैसे वाहून गेले

मुठा कालवा भगदाड : झोपडपट्टी भागात पंचनाम्यानंतर मदत देणार : बापट

मतं मागायला येता, मदतीला कधी येणार, पुण्याच्या महापौरांना घेराव

पुण्यातील मुठा कालव्याची भिंत नेमकी कशामुळे कोसळली?

बघे बघेपर्यंत घर भरलं, भिंत खचली, चूल विझली, होतं नव्हतं नेलं..!

पुण्यात कालव्याची भिंत कोसळली, रस्त्यावर महापुराचं चित्र