मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भगवान विष्णूचे अकरावे अवतार असल्याचा जावईशोध भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी लावला आहे. वाघ यांनी एक ट्वीट करत मोदींना थेट देव करुन टाकलं आहे.


नरेंद्र मोदी हे देशाचे प्रधानसेवक असून ते भारतमातेची सेवा ज्या प्रकारे करत आहेत, त्यामुळे ते माझ्यासाठी देवाप्रमाणे आहेत. तसेच देशाला नरेंद्र मोदीसारखे पंतप्रधान आणि नेते लाभले हे आपलं भाग आणि पुण्य आहे, असंही वाघ म्हणाले.


नरेंद्र मोदी आमच्यासाठी देवासमानच असल्याचं वाघ यांनी म्हटलं आहे. दरम्यान, मोदींची तुलना करताना केलेल्या ट्वीटमध्ये त्यांनी मराठी व्याकरणाचे बारा वाजवले आहेत. वाघ यांच्या या जावईशोधावर विरोधकांकडून सडकून टीका केली जात आहे.



याआधीही भाजपच्या नेत्यांकडून मोदींची देवाशी तुलना


- संसदीय कामकाज मंत्री असताना व्यंकय्या नायडू यांनी नरेंद्र मोदी हे देवाचं भारताला मिळालेलं वरदान आहेत, असं म्हटलं होतं.


- मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही मोदी म्हणजे देवाकडून मिळालेला आशीर्वाद असल्याचं म्हटलं होतं.


- भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे लोकेश चंद्र यांनी म्हटलं होतं की मोदी देवाचे अवतार आहेत. तसेच मोदी महात्मा गांधी पेक्षाही पुढे जाणार असल्याचं लोकेश चंद्र यांनी म्हटलं होतं.


- कर्नाटकमधील भाजप नेते जनार्दन रेड्डी यांनी मोदींची देवाशी तुलना केली होती.


- भाजपचे उत्तर प्रदेशमधील आमदार सुरेद्र सिंह यांनी नरेंद्र मोदी यांची रामाशी, अमित शाह यांची लक्ष्मणाशी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची हनुमानाशी तुलना केली होती.