मुंबई : जुहू स्कीम परिसरात गुलमोहर क्रॉस चौकाचं नामकरण ‘पंडित पंढरीनाथ कोल्हापुरे चौक’ असं करण्यात आलं. ज्येष्ठ गायिका आशा भोसले आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते नामकरण पार पडलं. पंडित पंढरीनाथ कोल्हापुरे हे बॉलिवूडमधील सध्याची आघाडीची अभिनेत्री श्रद्धा कपूरचे आजोबा होते.

या कार्यक्रमाला अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे, अभिनेत्री श्रद्धा कपूर, अभिनेते जॅकी श्रॉफ, जितेंद्र, शक्ती कपूर यांनी हजेरी लावली.

पंडित पंढरीनाथ कोल्हापुरेंचा अल्पपरिचय :

पंडित पंढरीनाथ कोल्हापुरे ( 16 फेब्रुवारी 1930 – 15 ऑगस्ट 2015) हे एक शास्त्रीय संगीत शिकविणारे गुरू होते.

पंढरीनाथ यांचे वडील कृष्णराव कोल्हापुरे हे नामांकित गायक आणि पट्टीचे बीनवादक होते. ते मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्यासमवेत बलवंत संगीत मंडळी या नाटक कंपनीचे भागीदार होते. पंढरीनाथ यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ वीणा वरदायिनी ही संस्था सुरू केली होती.

वडिलांकडून प्राथमिक पाठ गिरवल्यावर, पंढरीनाथांनी मधुसूदन जोशी आणि खाँसाहेब अता हुसेन या आग्रा घराण्याच्या ज्येष्ठ गायकांकडून तालीम घेतली. बडोद्यातल्या ऑल इंडिया म्युझिक कॉन्फरन्समध्ये वयाच्या अकराव्या वर्षीच त्यांनी जाणकारांचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर वयाच्या पंधराव्या वर्षी ते पहिल्यांदा रेडिओवर गायले.

बी.आर. देवधर मास्तरांकडे शिक्षण सुरू झाल्यावर पंढरीनाथांना कुमार गंधर्व भेटले. आधी गुरुबंधू असणारे कुमार नंतर गुरूही झाले. कुमाराच्या स्मरणार्थ पंढरीनाथ कोल्हापुरे यांनी फलटण गावात फलटणमध्ये संगीत महोत्सव सुरू केला.

 

पंढरीनाथ कोल्हापुरेंचं कुटुंब

शिवांगी, पद्मिनी आणि तेजस्विनी या पंढरीनाथ कोल्हापुरे यांच्या तीन मुली आहेत. पद्मिनी कोल्हापुरे आणि तेजस्विनी कोल्हापुरे यांनी अनेक हिंदी चित्रपटांतून भूमिका केल्या आहेत. तर शिवांगी कोल्हापुरे या गायिका आहेत. हिंदी चित्रपट अभिनेते शक्ती कपूर हे शिवांगी यांचे पती आहेत.