मुंबई : पोलीस हे जनतेचे मित्र असतात, तसेच सेवकही असतात. त्यामुळेच, लोकांच्या मदतीसाठी ते कर्तव्य बजावत धावून येतात. कधी अपघाताची (Accident) घटना असो किंवा गुन्हेगारीची असो, पोलिसांकडून तात्काळ घटनास्थळी धाव घेतली जाते. अनेकदा अपघातातील जखमींना रुग्णालयात पोहोचवण्याचे, येथील मृतदेहांवर शवविच्छदनाचे सोपस्करही पोलिसांकडूनच (Police) पार पाडले जातात. अशाच एका बेवारस मृतदेहाचा पंचनामान करताना पोलीस उपनिरीक्षकांचा अपघात झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सध्या त्यांच्यावर हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.
मुंबईतील दहिसर परिसरात भगवती रुग्णालयाच्या जवळील सुधीर फडके उड्डाण पुलाखाली बेवारस अवस्थेत आढळलेल्या मृतदेहाचा पंचनामा करण्याचं काम पोलिसांकडून सुरू होते. यावेळी, पंचनामा करताना 15 फूट उंचावरून नाल्यात पडून पोलीस अधिकारी गंभीर जखमी झाले आहेत. मुकेश खरात असं जखमी झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. सोमवारी सायंकाळी साडेचार वाजता ही घटना घडली. बेवारस मृतदेहाचा पंचनामा करत असताना रेल्वेचा भोंगा ऐकून मुकेश खरात हे पंधरा फूट खोल नाल्यात पडले.पुलावरून पडल्यामुळे पोलीस अधिकाऱ्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली असून बेशुद्ध अवस्थेत त्यांना बोरिवलीच्या करुणा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, खरात यांच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर, आता पुढील उपचारासाठी त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा
पुण्यातील खंडोबा मंदिरासाठी 24 एकर जमीन, शासन निर्णय जारी; जाणून घ्या किंमत किती?