Mumbai Congress Protest Against BJP : मुंबईकरांची अधिक गैरसोय होऊ नये काँग्रेसने भाजपविरोधात पुकारलेले आजचे आंदोलन थांबवत असल्याची घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. भाजपने गुंडगिरी करत मुंबईकरांना वेठीस धरले असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला.  आज भाजपचा गुंडगिरीचा चेहरा समोर आला असल्याचे त्यांनी सांगितले. 


आज मुंबईकरांची वाहतूक कोंडीमुळे झालेल्या गैरसोयीला भाजपच जबाबदार असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले. भाजप नेत्यांची, कार्यकर्त्यांची गुंडगिरी समोर आली असल्याचे त्यांनी सांगितले.


पंतप्रधान मोदी यांनी लोकसभेत केलेल्या वक्तव्याविरोधात आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर आंदोलन करण्याची घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली होती. त्याला जशास तसं उत्तर देण्याचा इशारा भाजपनं दिल्यानं संघर्ष अटळ असल्याचं म्हटलं. 'सागर' बंगल्यावर मोर्चा नेण्याच्या निर्णयावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ठाम होते. आम्ही 100 ते 150 कार्यकर्त्यांसह आंदोलन करणार असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले. त्यानंतर आंदोलन करू पाहणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.  


काँग्रेसच्या आंदोलनापूर्वी फडणवीसांच्या बंगल्याबाहेर पोहोचलेल्या भाजप कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केली. नाना पटोले यांच्या बंगल्याबाहेरही सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. त्यामुळे नागपूर, पुणे, औरंगाबादमध्ये दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमनेसामने आल्यानंतर त्याचा पुढील अंक आज मुंबईत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यासमोर पाहायला मिळण्याची शक्यता होती. काँग्रेसच्या आजच्या आंदोलनात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह  मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप हेदेखील सहभागी झाले. तर, दुसरीकडे भाजप खासदार गोपाळ शेट्टी, मिहीर कोटेचा, आमदार राम कदम यांच्यासह अनेक कार्यकर्ते भाजप आंदोलनाच्या बाजूने सहभागी झाले होते. 


भाजपचा महाराष्ट्रद्रोही चेहरा समोर आला; नाना पटोलेंची टीका 


छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्राचा अपमान झालेला भाजपला चालतो. मात्र, महाराष्ट्रविरोधी भूमिका घेणाऱ्या पंतप्रधानांचा निषेध राज्यातील भाजप नेते घेत नाहीत. महाराष्ट्राचा  अपमान झाला तरी चालेल. मात्र, मोदींविरोधात बोलणार नाही अशी भूमिका भाजप नेत्यांनी घेतली आहे. आज भाजपचा महाराष्ट्रद्रोही चेहरा उघड झाला असल्याची कठोर टीका पटोले यांनी केली.



देवेंद्र फडणवीस मूग गिळून का बसले? भाई जगताप यांची टीका


 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्राचा अपमान होत असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मूग गिळून गप्प का?  असा सवाल मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी केला. राज्यातील भाजप नेत्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या या वक्तव्याबाबत माफी मागावी अशी आमची साधी मागणी असल्याचे भाई जगताप यांनी सांगितले.