मुंबई:  नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या अडचणी आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. समीर वानखेडे यांच्याविरोधात जात पडताळणी अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. समीर वानखेडे यांनी बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारे सरकारी नोकरी मिळवली असल्याचा आरोप याआधी करण्यात येत होता. त्या मुद्यावरून आरोप प्रत्यारोप होत असताना आता थेट जात पडताळणी अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवण्यात आली आहे. भीम आर्मी आणि युथ रिपब्लिकन या संघटनांनी ही तक्रार दाखल केली आहे. 


राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांच्याकडून सातत्याने समीर वानखेडे यांच्यावर आरोप सुरू आहेत. समीर वानखेडे हे जन्माने मुस्लिम असून सरकारी नोकरी मिळवण्यासाठी त्यांनी अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील असल्याचे सांगत नोकरी मिळवली. वानखेडे यांनी खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारे ही नोकरी मिळवली असल्याचा आरोप मलिक यांनी याआधी केला होता. तर, समीर वानखेडे आणि त्यांच्या वडिलांनी हे आरोप फेटाळून लावत मुस्लिम नसून अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील असल्याचा दावा केला. 


या आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू असताना भीम आर्मी आणि स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाने या वादात उडी घेतली. या दोन्ही संघटनांना मुंबई शहर जिल्हा जात पडताळणी समितीकडे वानखेडे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. 


वानखेडे यांनी अनुसूचित जातीचा खोटा दाखला मिळवून त्या आधारावर सरकारी नोकरी मिळवली असल्याचे वृत्तांमधून समोर आले आहे. त्यामुळे वानखेडे यांची चौकशी करावी आणि त्यांचा दावा खोटा असल्यास तो रद्द करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी दोन्ही संघटनांनी केली आहे. 


काही दिवसांपूर्वीच समीर वानखेडे यांनी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांची भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी आपण अनुसूचित जात प्रवर्गातील असल्याचा दावा केला होता, असे वृत्त होते. समीर वानखेडे यांची जात पडताळणी करण्याबाबतही चर्चा सुरू होती. अखेर आता जात पडताळणी अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.