Priyanka Chaturvedi Vs Sanjay Shirsat : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्या एका वक्तव्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्या जोरदार जुंपली आहे. शिरसाट यांच्या वक्तव्यानंतर सुरु झालेलं वाकयुद्ध थांबता थांबत नाही. उद्धव ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी संजय शिरसाट हे गद्दार आणि असभ्य चारित्र्याचे असल्याचं म्हणत हल्लाबोल केला आहे. तर आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनीही संजय शिरसाट हे सडक्या विचारांचे असल्याचं म्हटलं आहे.
संजय शिरसाट काय म्हणाले होते?
"आदित्य ठाकरे यांनी प्रियंका चतुर्वेदी यांचं सौंदर्य पाहून त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिल्याचं चंद्रकांत खैरे म्हणाले होते," असं संजय शिरसाट म्हणाले होते. संजय शिरसाट यांच्या या वक्तव्यावर ठाकरे गटाकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
प्रियंका चतुर्वेदी यांचा हल्लाबोल
खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी देखील संजय शिरसाट यांना जोरदार फटकारलं आहे. मी कशी दिसते आणि कशी खासदार बनले हे संजय शिरसाट यांनी सांगायची गरज नाही. यावेळी त्यांनी भाजपवर देखील टीका केली. संजय शिरसाट यांनी आपल्या वक्तव्यातून असभ्य चारित्र्या दाखवून दिलं आणि ते भाजपसोबत आहेत हे आश्चर्याची बाब नाही.
प्रियंका चतुर्वेदींनी ट्वीट करुन सुनावलं
प्रियंका चतुर्वेदी यांनी ट्वीट करुन संजय शिरसाट यांना सुनावलं. त्या म्हणाल्या की, "मी कशी दिसते आणि मी जिथे आहे तिथे का आहे हे मला एका गद्दार व्यक्तीने सांगायची गरज नाही, ज्याने 50 खोक्यांसाठी आपला आत्मा आणि प्रामाणिकपणा विकला. संजय शिरसाट हे राजकारण आणि महिलांबद्दलच्या त्यांच्या विचारांमधील व्यापक आजाराचे एक उत्तम उदाहरण आहे, ते त्यांच्या टिप्पण्यांमधून स्वतःचे असभ्य चारित्र्य निश्चितपणे प्रदर्शित करतात, यात आश्चर्य नाही की भाजपने त्यांना त्यांच्यासोबत ठेवले आहे."
आदित्य ठाकरेंनीही फटकारलं
दुसरीकडे आदित्य ठाकरे यांनी देखील संजय शिरसाट यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. गद्दार आमदारांना त्यांची किंमत कळलेली आहे. अशा सडक्या विचारांचे लोक राजकारणात अजून टिकले कसे हा प्रश्न पडतो आणि दु:ख देखील होतं. पण जनता त्यांना त्यांची जागा दाखवेल, असं मला वाटतं."
कोण आहेत प्रियंका चतुर्वेदी?
प्रियंका चतुर्वेदी या 2019 मध्ये शिवसेनेत सामील झाल्या होत्या आणि 2020 पासून त्या राज्यसभेच्या खासदार आहेत. शिवसेनेत सामील होण्यापूर्वी त्या काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या होत्या. एकनाथ शिंदे यांच्या 40 आमदारांच्या बंडानंतर शिवसेनेत फूट पडली आणि पक्ष दोन गटात विभागला गेला. तेव्हापासून दोन्ही गटाकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसतात. प्रियंका चतुर्वेदी या उद्धव ठाकरे गटासोबत आहेत.