शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बाहेर येऊन भेटत नाही तोपर्यंत मातोश्रीच्या गेटवरुन हटणार नाही असा या शिक्षिकांचा निर्धार होता. मात्र उद्धव ठाकरे भेटणार नाहीत, आंदोलनाची ही जागा नाही, असं म्हणत पोलिसांनी शिक्षिकांना मातोश्रीसमोरुन हटवले. तरीही शिक्षिकांनी मातोश्रीसमोरच्या फूटपाथवरच ठिय्या आंदोलन केलं. यावेळी शिक्षिकांच्या डोळ्यात पाणी होतं.
याआधी गेले 22 दिवस विनाअनुदानित शाळांतील शिक्षकांचं आझाद मैदानावर आंदोलन सुरु होतं. मात्र याची दखल घेतली गेली नाही. महापौर, शिक्षण समिती अध्यक्ष, आयुक्त यांना भेटूनही काही तोडगा निघाला नाही. त्यामुळे अखेरचा पर्याय म्हणून मातोश्री समोर आंदोलन करण्यात आलं.
शिवसेना नेते अनिल परब यांच्या चर्चेच्या आश्वासनानंतर मातोश्रीसमोरील शिक्षिकांचं आंदोलन स्थगित करण्यात आलं. मात्र, येत्या दोन दिवसात तोडगा निघाला नाही तर आंदोलन तीव्र करु असा इशारा शिक्षिकांनी दिला. घराबाहेर आलो तरी उद्धव ठाकरेंनी साधी भेटही घेतली नाही, त्यामुळे मराठी शाळेच्या शिक्षिकांमध्ये नाराजी आहे.