Sunil Tatkare on Prithviraj Chavan : पृथ्वीराज चव्हाण कोणाबद्दल काय बोलत आहेत, याचं त्यांना भान नाही. त्यांचं वक्तव्य पोटकटपणाचं आहे, अशी जहरी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी केली. तसंच शरद पवारांना सोबत घेण्यासंदर्भात ना आम्ही भाजपला कोणता प्रस्ताव दिला आहे ना भाजपने आमच्याकडे असा कुठला प्रस्ताव दिला आहे, असंही त्यांनी सांगितलं. ते एबीपी माझाशी बोलत होते.


पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले होते?


फ्री प्रेस जर्नलच्या वृत्तानुसार, "पृथ्वीराज चव्हाण हे अजित पवार आणि शरद पवार यांच्या झालेल्या भेटीवर बोलताना म्हणाले की, अजित पवार भाजपसोबत सत्तेस सामील झाल्यानंतर शरद पवारही त्यांच्यासोबत येतील अशी शक्यता भाजपला वाटत होती. पण अजूनपर्यंत तरी तसं काही घडलं नाही. त्यामुळे केंद्रातील भाजपच्या सत्तेमध्ये सामील होण्यासाठी शरद पवारांना दोन मोठ्या ऑफर देण्यात आल्या आहेत. केंद्रीत कृषीमंत्रीपद आणि निती आयोगाच्या उपाध्यक्षपदाची ऑफर त्यांना देण्यात आली आहे. अजित पवारांनी पुण्यात शरद पवारांची चोरडिया यांच्या निवासस्थानी घेतलेल्या या भेटीत या ऑफरबद्दल चर्चा झाल्याची माहिती आहे. पण शरद पवारांनी भाजपची ही ऑफर नाकारली."


पृथ्वीराज चव्हाणांना भान नाही : सुनील तटकरे


याबाबत सुनील तटकरे यांना विचारलं असता ते म्हणाले की, शरद पवारांना सोबत घेण्यासंदर्भात ना आम्ही भाजपला कोणता प्रस्ताव दिला आहे ना भाजपने आमच्याकडे असा कुठला प्रस्ताव दिला आहे. पृथ्वीराज चव्हाण कोणाबद्दल काय बोलत आहेत याचं त्यांना भान नाही. त्यांचं वक्तव्य पोरकटपणाचे आहे. 


तसंच यावेळी सुनील तटकरे यांनी काँग्रेससह ठाकरे गटातील नेत्यांवरही जोरदार टीका केली. विजय वडेट्टीवार, नाना पटोले आणि ठाकरे गटातील काही नेते सध्या सभ्यता सोडून बोलत आहेत. सध्या विरोधक संकुचित वृत्तीने टीका करत आहेत. 


'आम्ही भाजपसोबत जाणं आणि मलिकांना जामीन मिळणं यात संबंध नाही'


अजित पवार यांच्या गटाने काल नवाब मलिक यांची भेट घेतली. या भेटीविषयी माहिती देताना सुनील तटकरे म्हणाले की, "नवाब मलिक यांच्या भेटीत कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही. त्यांच्या प्रकृतीसंदर्भात आम्ही भेटण्यासाठी गेलो होतो." "आम्ही भाजपसोबत जाणं आणि नवाब मलिक यांना जामीन मिळणं याचा दुरान्वय संबंध नाही," असंही त्यांनी सांगितलं


जयंत पाटील त्याच्या भूमिकेबाबत स्वतः सांगतील कसा करेक्ट कार्यक्रम करायचा हे त्यांना चांगलं माहिती आहे, असं सूचक वक्तव्य देखील सुनील तटकरे यांनी केलं.


अजित पवारांच्या कार्यकमांविषयी माहिती देताना सुनील तटकरे म्हणाले की, "अजित पवार लवकरात महाराष्ट्र दौऱ्यावर बाहेर पडणार आहे. तत्पूर्वी कार्यकर्त्यांचं म्हणणं जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. यासाठी त्या संघटनात्मक बैठका सुरु आहेत."


VIDEO : Sunil Taktare on Prithviraj Chavan : पोरकट पृथ्वीराज चव्हाणांना भान, नाही, सुनील तटकरेंची जहरी टीका




संबंधित बातमी


शरद पवारांना केंद्रात कृषीमंत्री आणि निती आयोगाच्या अध्यक्षपदाची ऑफर, अजित पवारांची भेट त्यासाठीच; पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा दावा