Kalyan News : कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात असलेल्या फुल मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात सुकलेल्या आणि कुजलेल्या त्यांचा कचरा तयार होतो. हा कचरा बाजार समितीकडून उचलून पालिकेच्या भराव भूमीवर टाकला जात होता, मात्र पालिका प्रशासनाने हा कचरा स्वीकारण्यास नकार देत या कचऱ्याची विल्हेवाट बाजार समितीने लावावी अशा सूचना दिल्या आहेत. तर बाजार समितीने देखील फुल मार्केटमधील गाळ्याचे भाडे महापालिका घेते त्यामुळे कचरा केडीएमसीनेच उचलावा एपीएमसी हा कचरा उचलणार नाही असा निर्णय घेतला आहे. परिणामी केडीएमसी आणि एपीएमसीच्या वादात फुल मार्केट समोर कचऱ्याचे भलेमोठे जमा झाले असून व्यापाऱ्यांसह फुलांच्या खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतोय. त्यामुळे आता या कचऱ्याला वाली कोण असा सवाल उपस्थित केला जात आहे.
कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात असलेले फुल मार्केट कल्याण डोंबिवली महापालिकेचे आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीकडून या फुल मार्केटचा कबजा घेण्याचा प्रयत्न चालला असला तरी केडीएमसी ही मोक्याची जागा कृषी उत्पन्न बाजार समितीला देण्यास तयार नाही. यामुळे पावसाळ्यात गुडघ्यावर चिखलाचा सामना करत या फुल मार्केटमध्ये व्यापाऱ्यांना फुलं विक्रीचा व्यवसाय करावा लागतो. आता महापालिका प्रशासनाने कचरा वर्गीकरण बंधनकारक करताना मोठ्या प्रमाणावर कचरा निर्माण करणाऱ्या सोसायट्या आणि प्राधिकरणांना त्यांच्या स्तरावर कचरा नष्ट करण्याची जबाबदारी दिली आहे.
कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दररोज तयार होणाऱ्या 15 ते 20 टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी स्वतःचा प्रक्रिया प्लांट उभारला असून बाजार समिती कचरा वर्गीकरण करून घेत या कचऱ्यावर प्रक्रिया करते. यासाठी बाजार समितीने इजेंसी देखील नेमली आहे. मात्र बाजार समितीच्या आवारात असलेल्या फुल मार्केटची मालकी पालिका प्रशासनाची असून ओटेधारक दरमहा महापालिकेला भाडे भरतात. यामुळे फुल मार्केटमध्ये तयार होणारा कचरा पालिका प्रशासनाने उचलून न्यावा, कचरा उचलून नेण्याची जबाबदारी बाजार समितीची नसल्याची भूमिका बाजार समितीकडून घेण्यात आली आहे. तर दुसरीकडे फुल मार्केट हे बाजार समितीच्या आवारात असल्याने बाजार समितीने आपली जबाबदारी म्हणून हा परिसर स्वच्छ ठेवावा, फुल मार्केटमधील कचऱ्यावर देखील त्यांनी प्रक्रिया करावी अशी भूमिका पालिका प्रशासनाने घेतली आहे. मात्र या वादात मागील आठ दिवसांपासून फुल मार्केट समोर फुलांच्या कचऱ्याचा ढीग साचला असून हा कचरा कुजल्याने परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली आहे.
याबाबत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कपिल थळे यांनी फुल मार्केट त्यांचे भाडे महापालिका दरमहा घेत असल्यामुळे या फूल मार्केटमध्ये तयार होणारा कचरा उचलण्याची जबाबदारी महापालिकेची आहे, आमची नाही असं सांगितलं आहे. तर पालिकेचे घनकचरा विभागाचे उपायुक्त अतुल पाटील एपीएमसी मार्केटच्या आवारातील कचरा त्यानी उचलणं अपेक्षित आहे, याबाबत त्यांच्याशी बैठक घेऊन त्यांना सूचना केल्या जातील, तसेच सध्य़ा साचलेला कचरा तातडीने उचलला जाईल असं आश्वासन दिलं आहे. मात्र या कचऱ्याची विल्हेवाट एपीएमसी प्रशासना लावली पाहिजे, अशी भूमिकाही त्यांनी घेतली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या