मुंबई महापालिकेच्या पहिल्या सभागृह बैठकीत महापालिकेच्या बँकेतील 61 हजार कोटींच्या ठेवींवरुन प्रशासनाला सर्वपक्षीयांनी धारेवर धरलं. एकीकडे 84 कोटींसाठी बेस्ट कर्मचाऱ्यांचे पगार अडले असतांना, ठेवींचे पालिका नेमके काय करते, असा सवाल सर्वपक्षीय नगरसेवकांनी केला.
मुंबईतील रस्ते, पाणी, शाळा आणि इतर पायाभूत सोयीसुविधांसाठी हा पैसा वापरला जावा. बँकेत ठेवून त्यावर केवळ व्याज कमावण्याचे कारण काय, असा सवालही उपस्थित केला.
काय आहे 61 हजार कोटींचं प्रकरण?
देशातली सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेचे तब्बल 61 हजार 510 कोटी रुपये शहरातील 31 बँकांमध्ये जमा असल्याचं समोर आलं आहे. यामध्ये चार खासगी बँकांचाही समावेश आहे. मुंबई महापालिकेच्या अर्थ विभागाने दिलेल्या माहितीतून ही बाब समोर आली.
दुसरी धक्कादायक गोष्ट म्हणजे या रक्कमेच्या केवळ व्याजापोटी मुंबई महापालिकेला तब्बल 4500 कोटी रुपये मिळतात. महापालिकेने ही रक्कम 1 कोटी 20 लाख मुंबईकरांना वाटली तर प्रत्येक करदाताच्या वाट्याला 51, 250 रुपये येतील.
महापालिकेच्या 61, 510 कोटी जमा रक्कमेमध्ये भविष्य निर्वाह निधी आणि निवृत्ती निधी 10,455 कोटी, अतिरिक्त निधी 10,927 कोटी आणि नागरी विशेष निधी 34,258 कोटी रुपयांचा समावेश आहे.
जकात करातून मुंबई महापालिकेला सर्वाधिक उत्पन्न मिळतं. जकात करातून दिवसाला 12 कोटींची कमाई होते. त्यामुळे एकीकडे मुंबईत रस्ते, पाणी, कचरा अशा मूलभूत सोयींचा अभाव असताना मुंबई महापालिकेचा अर्थात सर्वसामान्य मुंबईकरांचा पैसा बँकेत कशासाठी? असा प्रश्न विचारला जात आहे.