मुंबई : येत्या 10 जून रोजी राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्याआधी 5 जून रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा आयोजित केला आहे. काकाच्या दौऱ्यानंतर पुतण्या जात असल्याने शक्तिप्रदर्शन केलं जाणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे शिवसेना जय्यत तयारी करत आहे. काका अयोध्येत जाण्याआधीच पुतण्याचे होर्डिंगही लागले आहेत, तेही काकाच्या विरोधात, त्यामुळे अयोध्या दौऱ्याच्या निमित्ताने काका आणि पुतण्याचा अयोध्या दौरा वादळी ठरण्याची शक्यता आहे.


कसा असेल शिवसेनेचा अयोध्या दौरा?


- 10 जून रोजी सर्व शिवसैनिक अयोध्येत दाखल होणार


- प्रभू श्री राम जन्मभूमीचं दर्शन


- हनुमान गढी दर्शन


- लक्ष्मण किल्ला दर्शन


- पत्रकार परीषद


- शरयू नदी महाआरती


दौऱ्या आधी शिवसेनेची तयारी कशी?
10 जूनला होणाऱ्या शिवसेनेच्या आयोध्या दौरासाठी मोठी जय्यत तयारी शिवसेनेकडून सध्या सुरु आहे. दहापेक्षा अधिक रेल्वे गाड्या शिवसेनेकडून शिवसैनिकांना घेऊन आयोध्येत जाणार असल्याची चर्चा आहे. तसेच अयोध्येत प्रत्येक ठिकाणी दर्शन घेणार त्याठिकाणी देखील स्थानिक शिवसैनिकांकडून योग्य नियोजन करण्याची तयारी सध्या सुरु आहे. आतापासूनच मोठ्या संख्येने शिवसैनिक अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याने हॉटेल तसंच इतर व्यवस्था करण्यात येत असल्याची देखील माहिती मिळत आहे. एकंदरीत दौर्‍यात शिवसेना मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन करणार आहे.


शिवसेनेचे हिंदुत्व किती कडवे हे दाखवणार 
गेल्या काही वर्षांपासून शिवसेनेच्या हिंदुत्वावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. त्यामध्ये शिवसेनेचा आताचा अयोध्या दौरा हा फार महत्त्वाचा आहे. तसेच दुसरीकडे मनसेसारखा पक्ष शिवसेनेच्या हिंदुत्वाला आव्हान देत असताना, हे आव्हान स्वीकारुन शिवसेनेचे हिंदुत्व किती कडवं आहे हे सिद्ध करण्याचा हा प्रयत्न असणार आहे. तसंच विरोधी पक्ष भाजप उपस्थित करत असलेल्या अनेक प्रश्नांवर उत्तर देण्याचा प्रयत्न या दौर्‍यातून केला जाणार आहे. तर राज्यात आगामी काळात महापालिका निवडणुका होणार आहेत. या निमित्ताने शिवसेनेची ताकद काय आहे हे देखील दाखवण्याचा प्रयत्न या दौर्‍यातून केला जाण्याची शक्यता आहे.


दौऱ्यावरुन शिवसेना आणि मनसे टीका प्रत्युत्तर रंगणार
राज ठाकरेंच्या दौऱ्या आधी शिवसेनेकडून 'असली आ रहा है, नकली से सावधान' अशा स्वरुपाचे पोस्टर्स, होर्डिंग्ज सध्या अयोध्येत चर्चेचा विषय ठरले आहेत.  5 जूनला मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्याच्या पूर्वी हे बॅनर लागले आहेत. त्यामुळे शिवसेनेकडून मनसेला डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तसंच या बॅनरवरुन मनसे नेत्यांनी देखील शिवसेनेला कोण असली, कोण नकली हे पुढे कळेलच, असं प्रत्युत्तर दिलं आहे. त्यामुळे आगामी काळात अनेक घडामोडी घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मनसे आणि शिवसेनेचा आयोध्या दौऱ्याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे.