मुंबई : ओखी चक्रीवादळाच्या तडाख्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून उद्या (मंगळवार 5 डिसेंबर) मुंबईसह परिसरातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ट्विटरवरुन यासंदर्भात माहिती दिली आहे.

मुंबई महानगर प्रदेश (शहर आणि उपनगर), ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये शाळा आणि कॉलेजेसना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ओखी वादळाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव खबरदारी म्हणून शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे.

https://twitter.com/TawdeVinod/status/937692404320051200

दुसरीकडे, ओखी वादळाचा परिणाम जाणवू लागला आहे. मुंबईत पावसाला सुरुवात झाली आहे. आज मध्यरात्रीपासून मुंबईत सोसाट्याचा वारा आणि जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. समुद्र किनारी मोठ्या लाटा उसळण्याची शक्यता आहे.

दरम्यान मुंबई, कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये जोरदार पावसाचा इशाराही देण्यात आला आहे. मुंबईसह परिसरात संध्याकाळी पावसाच्या सरीही कोसळल्या.