मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर शनिवारी (23 एप्रिल) झालेल्या हल्ल्याचा वैद्यकीय अहवाल समोर आला आहे. हल्ल्यानंतर भाभा रुग्णालयात किरीट सोमय्या यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. किरीट सोमय्यांना मोठी दुखापत झाली नसल्याचं अहवालात म्हटलं आहे. या अहवालात किरीट सोमय्या यांना 0.1 सेंटीमीटरची जखम असल्याचं आढळून आलं आहे. यासोबत सूज नव्हती आणि रक्तस्रावही नव्हता असं भाभा रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
शिवसैनिकांनी प्राणघातक हल्ला केल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला होता. परंतु भाभा रुग्णालयाने किरीट सोमय्या यांच्या संदर्भातील अहवाल मुंबई पोलिसांना सादर केला. या अहवालानुसार सोमय्यांना 0.1 सेंटीमीटरची जखम होती. शिवाय सूज नव्हती आणि रक्तस्रावही झाला नव्हता.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांच्या यांच्या जखमेवर प्रश्न उपस्थित केले होते. त्यांनी टोमॅटो सॉस लावला असावा असंही राऊत म्हणाले होते. त्यामुळे ही जखम झाली होती की नाही याचा सुद्धा तपास मुंबई पोलीस करणार आहेत.
शिवसैनिकांनी सोमय्यांच्या गाडीवर बाटल्या-चपला फेकल्या
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसाचं वाचन करण्याची घोषणा करणाऱ्या राणा दाम्पत्याला खार पोलिसांनी शनिवारी (23 एप्रिल) अटक केली. भाजप नेते किरीट सोमय्या हे त्यांना भेटण्यासाठी गेले होते. राणा दाम्पत्याला भेटायला किरीट सोमय्या आल्याचं समजल्यानंतर शिवसैनिकांनी घोषणाबाजी सुरु केली. पोलीस स्टेशनमधून परत जात असताना किरीट सोमय्या यांना शिवसैनिकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. शिवसैनिकांनी किरीट सोमय्यांच्या गाडीवर बाटल्या आणि चपला फेकल्या. यामध्ये किरीट सोमय्यांच्या गाडीची काच फुटल्याचं सांगितलं जातं. तसंच किरीट सोमय्या या हल्ल्यात जखमी झाल्याचं म्हटलं जात होतं.
माझ्यावर झालेला हल्ला ठाकरे सरकारकडून स्पॉन्सर्ड : किरीट सोमय्या
"खार रोड पोलीस स्टेशन इथे माझ्यावर झालेला हल्ला ठाकरे सरकारने स्पॉन्सर्ड केलेला होता. रात्री साडेनऊच्या सुमारास पोलीस स्टेशनला येईन असं मी कळवलं होतं. त्यामुळे मी पोहोचण्यापूर्वीच 70-80 शिवसैनिकांनी खार पोलीस स्टेशनवर व्यवस्था केली होती. पोलीस स्टेशनच्या आवारात, पोलीस स्टेशनच्या दारापाशी जमले होते. येतानाही मला शिवीगाळ करण्याती आली. माझी गाडी थांबवण्याचा प्रयत्नही करण्यात आला. आणि परत जाताना मी पोलिसांना सांगितलं, हल्ला करणार आहेत. त्यावेळी त्यांनी व्यक्तीगत जबाबदारी घेतली. त्यांनी सांगितलं आम्ही सगळी व्यवस्था केली आहे. पण पोलीस स्थानकाचं दार उघडताच, बाहेर असलेल्या 70-80 गुंडांच्या हवाली माझ्या गाड्यांना करण्याचं पाप उद्धव ठाकरेंच्या पोलिसांनी केलं आहे. यासाठी संपूर्णपणे पोलीस आयुक्त संजय पांडे जबाबदार आहेत, असं किरीट सोमय्या म्हणआले होते.
संबंधित बातम्या
सोमय्या ओठांच्या खाली सॉस लावून जखमी झाल्याचा दावा करतात; संजय राऊतांचा टोला
Kirit Somaiya : सोमय्या नख कापून परमवीर चक्राचे दावेदार बनू पाहत आहेत; काँग्रेसची टीका
Kirit Somaiya PC : माझ्यावर झालेला हल्ला ठाकरे सरकारकडून स्पॉन्सर्ड : किरीट सोमय्या
Kirit Somaiya : मुंबईत राडा सुरूच, शिवसैनिकांच्या हल्ल्यामध्ये किरीट सोमय्या जखमी