मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने कांजूर मार्ग येथे मेट्रो कारशेड उभारण्यास स्थगिती दिल्यानंतर आता राज्य सरकार पुन्हा कार शेड हलवण्याच्या तयारीत आहे. मेट्रो 3 चे कार शेड बांद्रा कुर्ला संकुलातील बुलेट ट्रेनसाठीच्या प्रस्तावित जागेवर उभारता येते का? या पर्यायाची चाचपणी राज्य सरकार करत आहे. यावर मेट्रोच्या विषयावरून शह काटशहाचा प्रयत्न केला जाऊ नये, अशी टीका विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.


मेट्रोची कारशेड आरे येथे नेल्याची सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यांनतर पुन्हा कारशेड कांजूरमार्ग येथे हलविण्याची काही आवश्यकता नव्हती, तेथे नेण्याचा निर्णय झाल्यानंतर प्रत्यक्ष जागा ताब्यात घेण्यापूर्वीच मशिनरीसुध्दा कांजूरमार्ग येथे हलविण्यात आली. त्यावर सुमारे दीडशे कोटी रुपयाचा खर्च झाला आणि आता केवळ बुलेट ट्रेनचा प्रकल्प आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्वकांक्षी प्रकल्प आहे, म्हणून केवळ शहला काटशह द्यायचा अशा प्रकारचा एका कोत्या प्रवृत्तीचा निर्णय घेतला जात आहे. त्यामुळे माझी विनंती आहे की, एकमेकांवर चिखलफेक किंवा खो-खो सारखा एखादा प्रकल्प इकडे तिकडे घेऊन जाण्यापेक्षा व मुंबईकरांच्या महत्वाकांक्षी प्रकल्पला दिरंगाई करण्यात येऊ नये.


'इगो सोडा, आरेमध्ये काम सुरु करा, आम्ही टीका करणार नाही' : देवेंद्र फडणवीस


त्यासाठी विरोधी पक्ष, सत्ताधारी पक्ष आणि मुंबईतील या क्षेत्रातील काही तज्ज्ञ यांनी एकत्रित येऊन कोणालाही अडचण होणार नाही अशी जागा शोधली पाहिजे आणि मुंबईकरांसाठी हा प्रकल्प एका निश्चित वेळेत पूर्ण केला पाहिजे. कारण मुंबईकरांना प्रवासासाठी व वाहतुकीसाठी सध्या अडचण होत आहे, त्यामुळे अश्या प्रकारचे वाद विवादामुळे मुंबईकर व्यथित झाला आहे. त्यामुळेच जागेचा सोक्षमोक्ष लावावा. सरकारने कांजूरमार्गचा डीपीआर बनवला असेल आणि आता पुन्हा एकदा बुलेट ट्रेनची वांद्राची जागा तुम्ही घेण्याचा विचार करत आहे. त्यामुळे आता बुलेट ट्रेनसाठी जी प्रक्रिया पूर्ण झाली असेल ती वाया जाणार, पुन्हा त्यासाठी नवीन डीपीआर करावा लागेल, त्यामुळे सरकारला मुंबईकरांना खरंच मेट्रो रेल देण्याची इच्छा आहे का असा सवाल विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी उपस्थित केला.


मेट्रो कारशेड पुन्हा नवीन जागेवर?
मेट्रो कारशेड कांजूर मार्ग इथे उभारण्यास न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर पुढे न्यायालयातील सुनावणी दीर्घकाळ चालण्याची शक्यता आहे. त्यामुळे मेट्रोच्या कामावर परिणाम होऊ नये म्हणून मेट्रो 3 चे कार शेड बांद्रा कुर्ला संकुलातील बुलेट ट्रेनसाठीच्या प्रस्तावित जागेवर उभारता येते का या पर्यायाची चाचपणी करण्यात येत आहे. राज्य सरकार याबाबत चाचपणी करत आहे. मेट्रो कार शेडबाबत कांजूर मार्ग येथील जागेच्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे.


Mumbai Metro 3 | मुंबई मेट्रो 3 कधी आणि कशी पूर्ण होणार? कारशेडच्या वादामुळे 2023चा मुहूर्त हुकणार?