Prashna Maharashtrache : "पोलिसांना क्वॉर्टर्स द्या पण फुकटात घर नको. मुंबईतील बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पात असणाऱ्या पोलिसांना फुकटात घर देणं अव्यवहारिक ठरेल," असं राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले. एबीपी माझाच्या प्रश्न महाराष्ट्राचे कार्यक्रमात जितेंद्र आव्हाड यांनी मुंबईतील सर्वसामान्यांच्या घरांबाबत प्रश्नावर भाष्य केलं.


मुंबईतील बीडीडी पोलीस वसाहतीत अनेक कुटुंब वर्षानुवर्षे राहत आहेत. बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पात असणाऱ्या पोलिसांच्या घराचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यावर राज्य सरकारने निर्णय घेत पोलिसांना हे घर 50 लाख रुपये बांधकाम खर्चात मिळेल, असं गृहनिर्माण मंत्री यांनी घोषणा केली. परंतु यावरुन राजकारण सुरु झालं. "घर नव्हतं तर घर दिलं, ते दिलं तर कमी किंमतीत द्या, कमी किंमतीत दिलं तर आता परवडत नाही. जर प्रत्येक पोलिसाने म्हटलं की मी राहत असलेलं घर माझ्या नावावर करा तर इतर पोलिसांनी कुठे राहायचं? सरकारने एवढ्या क्वॉर्टर कुठून आणायच्या? सरकारला किती आर्थिक फटका बसेल? बांधकाम खर्च एक कोटी धरला तर तर 2250 कोटी रुपये खर्च येतो. फुकटात दिले तर 2250 कोटी सरकारला द्यावे लागतील. 50 लाखात दिले तर 1125 कोटी रुपये सरकारला भरावे लागतील. यामुळे तिजोरीत खडखडाट होईल. काही वेळा कठोर निर्णय घ्यावे लागतात. सरकारी क्वॉर्टर्स मालकीने देण्याची प्रथा सुरु झाली तर महाराष्ट्र येत्या काळात अडचणीत सापडेल," असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. 


बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प गेल्या तीन वर्षां विविध कारणांमुळे रखडत होता. या प्रकल्पात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरांबाबत प्रश्न प्रलंबित होता. बीडीडी पुनर्विकास प्रकल्पात पोलीस कुटुंबीय हे 16 चाळीत  राहतात. सुमारे 2 हजार 250 पोलीस कुटुंबीय राहत आहेत. त्यामुळे बांधकामाच्या अनेक बाबी रखडल्या होत्या. त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व गृहनिर्माण मंत्र्यांनी बैठक घेत या बीडीडी येथील पोलीस कुटुंबियांना पन्नास लाख रुपयात घर देण्यावर निर्णय घेतला. मात्र पन्नास लाख रुपये हे या पोलीस व कुटुंबियांना परवडणारे नाहीत अशी प्रतिक्रिया बीडीडी चाळीत राहणाऱ्या पोलीस व त्यांचे कुटुंबीय सांगतात. त्यामुळे सरकारने पुन्हा एकदा नीट विचार करून आम्हाला परवडेल असं घर आम्हाला उपलब्ध करून द्यावं अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड ,स्थानिक आमदार आदित्य ठाकरे यांच्याकडे करतात.

 


Prashna Maharashtrache : Maharashtra Minister Jitendra Awhad : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार (Maha Vikas Aghadi) येऊन जवळपास अडीच वर्ष पूर्ण झाली आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वातील हे सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक घोषणा केल्या. सोबतच विकासकामांचे दावे देखील करण्यात आले. परंतु, सामान्य माणसांचे प्रश्न कुठेतरी मागे राहिल्याचं चित्र आहे. महागाई, रोजगार, शेतीसमोरील आव्हानं, उद्योगातील समस्या असे अनेक सवाल सामान्य माणसांसमोर उभे ठाकले आहेत. याच निमित्ताने आज एबीपी माझाने 'प्रश्न महाराष्ट्राचे' हा कार्यक्रम आयोजित केला. यात मुंबई, विदर्भ, मराठवाडा, कोकण, उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्र अशा सर्व भागांतून सामान्य नागरिकांचे सवाल उत्तरदायी असलेल्या नेत्यांना आणि मंत्र्यांना विचारण्यात येणार आहेत. 


राज्यातील दिग्गज नेते आणि मंत्र्यांचा सहभाग


या कार्यक्रमात सकाळी 10 वाजता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील सहभाग घेतला. त्यांच्याशी कायदा सुव्यवस्था विषयावर संवाद होणार आहे. तर 11 वाजता शालेय शिक्षण व्यवस्थेवर राज्यमंत्री बच्चू कडू हे सहभाग झाले होते. 12 वाजता कृषीसंदर्भातील प्रश्नांवर राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांच्याशी संवाद साधण्यात आला.


दुपारी एक वाजता भाजप नेते आमदार आशिष शेलार यांच्याशी संवाद साधला. तर दुपारी 2 वाजता मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याशी गृहनिर्माण संबंधी प्रश्नावर चर्चा होणार आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ दुपारी तीन वाजता या कार्यक्रमात भाग घेतील तर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हे सायंकाळी 4 वाजता प्रश्नांची उत्तरं देतील. 


भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील 4.30 वाजता या कार्यक्रमात सहभागी होतील तर महसूल संबंधी प्रश्नांवर बोलण्यासाठी मंत्री  बाळासाहेब थोरात हे 5 वाजता कार्यक्रमात सहभागी होतील.


कुठे पाहाल कार्यक्रम?


हा सर्व कार्यक्रम आपण आज दिवसभर एबीपी माझा चॅनलवर पाहू शकणार आहोत. तसेच एबीपी माझाच्या यू ट्यूब चॅनेलवर दिवसभर या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण होईल. सोबतच एबीपी माझाच्या वेबसाईट, फेसबुक, ट्विटरवरही कार्यक्रमाचे अपडेट्स आपल्याला पाहायला मिळणार आहेत.