मुंबई : लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर देशातील आणि विविध राज्यातील काँग्रेसची स्थिती सध्या बिकट बनली आहे. या संधीचा फायदा भाजप घेताना दिसत आहे. भाजप पक्ष म्हणून कुठल्याही फोडाफोडीच्या नीतीमध्ये सामील नाही, मात्र येणाऱ्या लोकांसाठी आम्ही दरवाजे बंद करु शकत नाही, असं सूचक वक्तव्य केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलं आहे. प्रकाश जावडेकर यांनी आज 'एबीपी माझा'च्या 'माझा कट्टा' या कार्यक्रमात विविध विषयांवर मनमोकळ्या गप्पा मारल्या. यावेळी त्यांनी काँग्रेस नेतृत्तावरही टीका केली.


गोवा, कर्नाटक राज्यात मोठ्या प्रमाणावर काँग्रेसचे आमदार भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. याविषयी बोलाताना प्रकाश जावडेकर म्हणाले की, काँग्रेसच्या नेत्यांना पक्षात भवितव्य दिसत नाही. काँग्रेस नेतृत्वाची प्रेरणा देण्याची क्षमता संपली आहे. कर्नाटकातील जे आमदार पक्षातून बाहेर पडले त्यांनी काँग्रेसमधील कार्यपद्धतीला कंटाळून राजीनामा दिल्याचं म्हटलं आहे. दुसरीकडे गोव्यातही तशीच परिस्थिती आहे. अनेकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात काम करण्याची इच्छा आहे. त्यामुळे ते स्वत: भाजपमध्ये सामील होत आहेत, असंही प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं.


काँग्रेस सध्या नेतृत्व नसलेला पक्ष आहे. काँग्रेस पक्ष लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर खचला असून त्यांची लढण्याची जिद्द संपली आहे. एका कुटुंबाच्या बाहेर काँग्रेस जात नसून क्षमता नसतानाही एकाच घराकडे पक्षाचं नेतृत्व आहे. काँग्रेस एका कुटुंबासाठी काम करत आहे आणि भाजप देशासाठी काम करतो, हा दोन्ही पक्षांमधील फरक आहे, अशी टीका प्रकाश जावडेकर यांनी काँग्रेसवर केली.


भाजपकडे घराणेशाहीची परंपरा नाही. भाजपचं नेतृत्व एका घराकडे नाही. एखादा आमदार आणि खासदार वगळता आमच्याकडे घराणेशाहीची परिस्थिती नाही. ज्यांची क्षमता आहे त्यांना भाजपमध्ये संधी दिली जाते. पक्ष चालवणारे आमच्याकडे घराणेशाहीतून येत नाहीत, असंही प्रकाश जावडेकरांनी सांगितलं.