मुंबईतील तरुणाई ई-सिगरेट्सच्या विळख्यात अडकली आहे. मुंबईत सहजपणे ई-सिगरेट्स, पेन हुक्का, वेप, ई-शिशा उपलब्ध होतात. पेन हुक्क्याचं तरुणाईला मोठं आकर्षण आहे. 'एबीपी माझा'ने यासंदर्भात बातमी दाखवल्यानंतर ई-सिगरेट्स आणि तत्सम पदार्थांविरोधात अन्न आणि औषध प्रशासनाने विशेष मोहीम राबवली.
मुंबईतील वांद्रे, अंधेरी, गोरेगावमध्ये ही कारवाई करण्यात आली. वांद्र्यातील 'ईझी स्मोक'मधून एक लाखाच्या ई-सिगरेट्सचा साठा जप्त करण्यात आला. 'गॉडफ्रे फिलीप्स इंडिया लिमिटेड' यांच्याकडून 1.23 लाखाचा वेप्सचा साठा जप्त करण्यात आला. तसंच इतर 74 घाऊक आणि किरकोळ विक्रेत्यांकडूनही ई-सिगरेट्सचे साठे जप्त करण्यात आले.
ई-सिगरेट्स, पेन हुक्का यासारख्या पदार्थांची विक्री ऑनलाईन मार्केटमध्येही केली जाते. त्यासाठी अश्या ऑनलाईन पोर्टलवरील विक्रीवरही प्रतिबंध घालण्यात येणार आहे. ई-सिगरेट्समध्ये असलेले निकोटिन आणि ऑर्गेनिक व्होलाटाईल सॉल्वल्ट हे आरोग्याला अपायकारक घटक असल्यामुळे एफडीएने बंदी घातली आहे.