मुंबई : 'आज के शिवाजी - नरेंद्र मोदी' या पुस्तकावरुन सुरू झालेल्या वादावर भाजपने अखेर पडदा टाकला आहे. नुकत्याच प्रकाशित झालेल्या पुस्तकाचा भाजपशी काहीही संबंध नाही. भाजपच्या कार्यक्रमाचाही तो भाग नव्हता. लेखकाने क्षमा मागितली असून पुस्तकही मागे घेण्यात आले असून हा वाद आता संपला आहे, असं ट्विट करुन केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी भाजपची भूमिका स्पष्ट केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज महान शासक होते. लोककल्याणासाठी शिवाजी महाराजांनी अथक परिश्रम केले. अनेक शतकानंतरही त्यांची चिरंतन प्रेरणा आजही कायम आहे. त्यांची तुलना इतर कुणाशीही होवू शकत नाही, असंही प्रकाश जावडेकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वादग्रस्त तुलनेवरुन संपूर्ण महाराष्ट्रात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. पण या पुस्तकाचे लेखक आणि भाजप नेते जयभगवान गोयल हे आपल्या म्हणण्यावर ठाम होते. मात्र, आता प्रकाश जावडेकर यांनी केलेल्या ट्विटनुसार लेखकाने माफी मागून पुस्तक मागे घेतलं आहे.
काय आहे वाद?
भाजप नेते जयभगवान गोयल यांनी 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' असं शिर्षक असलेलं पुस्तक लिहलं आहे. या पुस्तकावरील मुखपृष्ठावरील फोटो आणि शिर्षकातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना करण्यात आली आहे. या पुस्तकाचे अनावरण भाजपच्या कार्यालयात करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना केल्याने लेखक आणि भाजप विरोधात देशभरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. यावरुन भाजपचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या नेत्यांनी यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. तर, महाराष्ट्रातील शिवभक्तांनीही याविरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.
वादावर पडदा?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्याने जनतेत रोष आहे. भाजपवगळता सर्वच राजकीय पक्ष आणि वंशजांनी या पुस्तकाचा विरोध करत ते मागे घेण्याची मागणी केली होती. यावर भाजपकडून अगोदर या पुस्तकाचा भाजपशी काहीही संबंध नसल्याचं सांगण्यात आलं. मात्र, तरीही हा वाद काही मिटण्याचे नाव घेत नाहीये. हे पाहून आता केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विट करुन पुस्तक मागे घेतल्याची माहिती दिली आहे. सोबतच वाद संपल्याचे सांगत यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे.
संबंधित बातम्या :
- 'आज के शिवाजी-नरेंद्र मोदी' पुस्तकावरुन भाजपनं हात झटकले
- हिटलरवरही पुस्तक लिहिण्याचा जितेंद्र आव्हाडांचा सल्ला, पुस्तकावर जयभगवान गोयल ठाम
- शिवाजी महाराजांसोबत मोदींची तुलना करुन चूक केली नाही, पुस्तकावर जयभगवान गोयल ठाम
Protest over Book | 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' पुस्तकाविरोधात पुणे, नाशिक, कोल्हापूर, सोलापुरात आंदोलन | ABP Majha