मुंबई : भाजप-शिवसेना युती झाल्यानंतर आता पोस्टरयुद्ध चांगलेच रंगू लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवसेनाभवनासमोर युतीची खिल्ली उडविणारे पोस्टर्स लावल्यानंतर आता मनसेकडूनही शिवसेनेची खिल्ली उडविणारे पोस्टर्स मातोश्रीबाहेर लावण्यात आले आहेत.

'वाघाची सिंहाला मिठी...सत्ताकारणासाठी' अशी मनसे कार्यकर्त्यांकडून मातोश्रीच्या बाहेर पोस्टरबाजी करण्यात आली आहे. काल शिवसेना भवनासमोर शिवसेनेकडून भाजप सेना युती ही हिंदुत्वासाठी आणि देशासाठी अशाप्रकारचे पोस्टर लावण्यात आले होते. त्या पोस्टरबाजीनंतर रात्री मनसेकडून ही पोस्टरबाजी करण्यात आली आहे.

उद्धव ठाकरेंची अमित शाहांना मिठी, शिवसेनेचे होर्डिंग्सच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन
भाजपवर टीका करण्याची एकही संधी न सोडणाऱ्या शिवसेनेने पुन्हा भाजपशी युती केली आहे. युतीच्या घोषणेनंतर शिवसेनेची सोशल मीडियात मोठ्या प्रमाणावर खिल्ली उडवली जात आहे. सोबतच विरोधी पक्षांकडूनही शिवसेना भाजप युतीवर टीका केली जात आहे. परवा राष्ट्रवादीने शिवसेना भवनासमोर होर्डिंग्स लावून भाजपबरोबर केलेल्या युतीची खिल्ली उडवली होती. या पार्श्वभूमीवर शिवसेनेनेही मुंबईत होर्डिंग्सच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन सुरु केले आहे.

अमित शाह-उद्धव ठाकरे यांनी एकमेकांना मारलेल्या मिठीचे शिवसेनाभवनासमोर भले मोठे होर्डिंग्स लावले आहेत.  शिवसेना-भाजप युती हिंदुत्वासाठी, देशप्रेमासाठी केल्याचे हॉर्डिंगवर स्पष्टीकरण देण्यात आले आहे. माहीम विधानसभा मतदार संघाचे स्थानिक शिवसेना आमदार सदा सरवणकर यांनी हे होर्डिंग्स लावले आहेत.  होर्डिंगवर शिवसेना सचिव आणि उद्धव ठाकरेंचे स्वीय सचिव मिलिंद नार्वेकर यांचाही सरवणकर यांच्यासोबत फोटो आहे.