मुंबई : बेस्टकडून भाडेकपातीचा निर्णय घेतला जात असताना मात्र मुंबईत रिक्षा-टॅक्सी भाडेवाढ होण्याची शक्यता आहे. रिक्षा-टॅक्सी भाडेवाढ झाल्यास टॅक्सीचं किमान भाडे 22 रुपयांवरुन 25 रुपये तर रिक्षाचे किमान भाडे 18 रुपयांवरुन 21 रुपये होण्याची शक्यता आहे.
भाडेवाढीसंदर्भात परिवहन विभाग, टॅक्सी संघटना, मुंबई ग्राहक पंचायतींमध्ये बैठक पार पडली. या बैठकीत टॅक्सी संघटनांनी 3 रुपये भाडेवाढीचा प्रस्ताव सादर केला आहे. गेल्या तीन वर्षात टॅक्सीच्या भाड्यात वाढ झालेली नाही.
मात्र ग्राहक पंचायतीने या भाडेवाडीला अटींसह समर्थन दिलं आहे. भाडे निश्चितीसाठी 2017 साली नेमलेल्या खटुआ समितीच्या शिफारसींवर भाडेवाढ व्हावी ही ग्राहक पंचायतीची मागणी आहे. मात्र हॅप्पी अवर्स आणि लांबच्या प्रवासासाठी सवलतींसह भाडेवाढ करा, अशी मागणी ग्राहक पंचायतीची आहे.
खटुआ समितीच्या शिफारसीनुसार पुढील आठ किलोमीटरच्या प्रवासात 15 ते 20 टक्के प्रवास सवलत आणि दुपारी 12 ते सायंकाळी 4 वेळेत 15 टक्के प्रवास सवलत लागू करण्याची मागणी ग्राहक पंचायतीने केली. यावर परिवहन विभागाने दोघांनाही लेखी निवेदन सोमवापर्यंत सादर करण्यास सांगितले आहे.