बाळासाहेबांच्या जयंतीदिनी 33 हजार पंचमुखी रुद्राक्षांचं पोट्रेट
एबीपी माझा वेब टीम | 23 Jan 2019 09:06 AM (IST)
जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सचा विद्यार्थी चेतन राऊत या कलाकाराने रुद्राक्षांनी शिवसेनाप्रमुखांची ही प्रतिमा साकारली आहे. 8 बाय 8 फूट या आकारातील ही प्रतिमा असून तब्बल 33 हजार रुद्राक्षांचा वापर केला आहे.
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. आपल्या लाडक्या नेत्याला आदरांजली वाहण्यासाठी एका चाहत्याने 33 हजार पंचमुखी रुद्राक्षांपासून पोट्रेट बनविले आहे. शिवसेना भवनासमोर हे 8 फुटांचं पोर्ट्रेट लावण्यात आलं आहे. 33 हजार पंचमुखी रुद्राक्षांपासून हे पोट्रेट बनवण्यात आलं आहे. जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सचा विद्यार्थी चेतन राऊत या कलाकाराने रुद्राक्षांनी शिवसेनाप्रमुखांची ही प्रतिमा साकारली आहे. 8 बाय 8 फूट या आकारातील ही प्रतिमा असून तब्बल 33 हजार रुद्राक्षांचा वापर केला आहे. रुद्राक्षांसोबत बाळासाहेब ठाकरेंचं वेगळंच नातं होतं. त्यामुळेच त्यांची प्रतिमा रुद्राक्षांनी साकारण्याचे मी ठरवले असे, चेतन राऊत याने म्हटले आहे. याद्वारे जागतिक विक्रम करण्याचा प्रयत्नही आपण केला असल्याचेही राऊतने सांगितले. त्याने आपल्या दहा सहकार्यांच्या मदतीने ही प्रतिमा साकारली. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांच्या स्मारकाचं भूमिपूजन केलं जाणार आहे. सकाळी 10 वाजता शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गणेश पूजन होऊन स्मारकाच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे. कालच्या कॅबिनेट बैठकीत स्मारकासाठी 100 कोटींच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. मुंबईच्या महापौरांचं निवासस्थान असलेल्या बंगल्यात हे स्मारक होणार आहे. त्यासाठी महापौरांचं निवासस्थान बदलून ते आता राणीच्या बागेत हलवण्यात आलं आहे. महापौर बंगल्याला हेरिटेज दर्जा असल्यामुळे मूळ बंगल्यात कोणताही बदल न करता बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक अंडरग्राऊंड होणार आहे.