मीरा-भाईंदर : भाजप आमदार नरेंद्र मेहता आणि मीरा-भाईंदर महापालिकेचे आयुक्त डॉ. नरेश गीते यांच्यात जुंपलेल्या वादात अखेर गीते यांची बदली नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी करण्यात आली. या बदलीच्या प्रकरणात शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली असून, मीरा-भाईंदरमध्ये आता आयुक्त नरेश गीते यांच्या बदलीमुळे शिवसेना आणि भाजपमध्ये जुंपली आहे.


मीरा-भाईंदर महापालिकेचे आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी 16 ऑगस्ट 2016 रोजी मीरा-भाईंदरच्या महापालिका आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतली. काही महिने गीते काम करताना पालिकेत भाजपाचा महापौर आणि सत्ता असतानाही कोणतीही तक्रार नव्हती. मात्र गीते यांनी पालिकेतील उधळपट्टी रोखण्यासह अनेक बेकायदेशीर बांधकामं आणि प्रस्ताव रोखण्यास सुरूवात केली. याचमुळे सत्ताधारी भाजप आणि आयुक्तांच्या वादा-वादीला सुरूवात झाली. नगररचना विभागातील नियमबाह्य कामांनाही त्यांनी खोडा घातल्याने आर्थिक रसद बंद झाली आणि बिल्डर लॉबीसह काही लोकप्रतिनिधी देखील त्रासले होते.

आयुक्त गीते आणि भाजपात मध्यंतरी एवढी दरी वाढली, की भाजपच्या महापौर, उपमहापौर आणि सभागृह नेत्यांनी आपली दालनेच आयुक्तांच्या मनमानीविरोधात बंद केली. आमदार मेहतांनी आयुक्तांच्या बदलीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली. मात्र पाच महिन्यांनंतर मुख्यमंत्र्यांनी ही बदली केली. भाजपने आयुक्तांची कोंडी चालवली होती. काम करण्यापेक्षा वेगवेगळे वाद उभे केले जात असल्याने आयुक्तही बदली करून घेण्याच्या प्रयत्नात होते. तर येथे भाजपाविरोधकांनीही आपली राजकीय धार अधिक तीव्र केली. सत्ताधाऱ्यांनी दालने बंद केल्याने बहुजन विकास आघाडीने तर महापालिकेबाहेर नागरिकांसाठी ‘काम करो अभियान’ खोलून आंदोलन सुरू केलं.

भाजपने मात्र शिवसेनेच्या सर्व आरोपाचं खंडण करून, केवळ शिसेना राजकारण करत असल्याचा प्रतिदावा केला आहे. आयुक्तांच्या हेकेखोर स्वभावामुळे शहरातील विकास कामं रखडल्याचा आरोप भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांनी केला. शहरातील कर वसुली केवळ 25 टक्केच झाल्यामुळे महापालिका चालवणं भविष्यात कठीण होणार आहे. जनतेने आम्हाला निवडून दिल्याने, जनतेला आम्हाला उत्तर द्यायचं आहे, असं उत्तर आमदार मेहता यांनी दिलं आहे.