नवी मुंबई : महानगरपालिकेच्या एनएमएमटीच्या नॉन एसी बसच्या प्रवास भाड्यात 20 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. तर दुसरीकडे एसी बसच्या प्रवास भाड्यात 25 टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे.
नवी मुंबई महापालिकेची परिवहन सेवा विविध कारणांमुळे तोट्यात आहे. तर दुसऱ्या बाजूला ओला, उबरमुळे एसी बसच्या उत्पन्नावरही परिणाम झाला आहे. हा तोटा भरून काढण्यासाठी आणि अधिकाधिक प्रवासी एसी बसकडे वळावेत, यासाठी एसी बसची भाडेवाढ 25 टक्क्यांनी कमी करण्यात आली.
नॉन एसी बसची करण्यात आलेली भाडेवाढ ही 12 किलोमीटरच्या पुढे करण्यात आल्याने प्रवाशांना आर्थिक फटका बसणार नसल्याचं महापालिकेतर्फे सांगण्यात आलं आहे. तसेच एनएमएमटीची ही भाडेवाढ बेस्ट आणि एसटीच्या तुलनेत कमी असल्याचाही दावा करण्यात आला आहे.