नवी मुंबई : गेला महिनाभर माझी बदनामी केली जात असून यामागे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप भाजप आमदार गणेश नाईक यांनी केला आहे. निवडणुका असल्याने माझी प्रतिमा मलिन करण्याचा विरोधकांचा डाव असल्याचंही गणेश नाईक म्हणाले. हायकोर्टाने जामीन दिल्यानंतर गणेश नाईक आज पहिल्यांदाच बाहेर आले होते. नवी मुंबई महापालिका आयुक्तांची भेट घेत शहरातील समस्या सोडवण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना गणेश नाईक यांनी विरोधकांवर शरसंधान साधलं.


गणेश नाईक यांनी आरोप केला आहे की, "गेल्या एक महिन्यापासून माझी बदनामी केली जात असून यामागे राजकीय षडयंत्र आहे. नवी मुंबई शहरातील जनतेने आपल्याला गेली 25 वर्ष सत्तेत ठेवलं असल्याने राजकीयदृष्ट्या महानगरपालिका जिंकणं विरोधकांना शक्य झालं नाही. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर माझ्याविरोधात षडयंत्र रचून माझी इमेज खराब करण्याचा विरोधकांचा डाव आहे." कोर्टाकडून बंधने असल्याने आपण जास्त काही बोलणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं.


गणेश नाईक यांना हायकोर्टाचा दिलासा
जीवे ठार मारण्याची धमकी आणि बलात्काराच्या आरोपात गणेश नाईक यांना 4 मे रोजी मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला. 25 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर नाईकांना अटकपूर्व जामीन मंजूर केला. एका महिलेने बलात्कार आणि फसवणुकीचे आरोप केल्यानंतर गणेश नाईक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात ठाणे न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर गणेश नाईक यांच्यावर अटकेची टांगती तलवार होती. यानंतर गणेश नाईक यांनी हायकोर्टात धाव घेतली होती. तिथे त्यांना दिलासा मिळाला.


नेमकं प्रकरण काय? 
गणेश नाईक यांच्यासोबत प्रेमसंबंध असणाऱ्या एका महिलेने तब्बल 27 वर्षांनी त्यांच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. याबाबत नेरुळ पोलीस ठाण्यात कलम 376 अन्वये गुन्हा दाखल आहे. तर रिव्हॉल्व्हर दाखवून धमकावल्याप्रकरणी सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्यातही नाईक यांच्याविरुद्ध याच महिलेने स्वतंत्र गुन्हा दाखल केला आहे. नेरुळच्या गुन्ह्यासंदर्भात अनेकदा आपल्या इच्छेविरोधात शरीरसंबंध ठेवले गेल्याचं या महिलेने तक्रारीमध्ये म्हटलं आहे. नवी मुंबई पोलिसांनी पुरावे गोळा करण्यासही सुरुवात करुन या महिलेची वैद्यकीय चाचणीही केली. 


माझ्या जीवाला धोका; गणेश नाईकांवर आरोप करणाऱ्या महिलेचा आरोप 
माझ्याह मुलाच्या जीवाला धोका असल्याचं वक्तव्य संबंधित महिलेने केलं आहे. गणेश नाईक यांच्याविरोधात तक्रार करणाऱ्या महिलेचा जीवाला धोका असल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. महिला व्हायरल व्हिडीओमध्ये म्हणाली की, "माझ्यासह मुलाच्या जीवाला धोका आहे. माझ्या जीवाचे कधीही बरे वाईट होऊ शकते. माझ्या अपहरणाची किंवा कधीही माझ्या हत्येचा कट रचण्याची शक्यता आहे. मला सर्वांनी सहकार्य करावे अशी विनंती मी करत आहे. मला सरकारकडून जे सहकार्य मिळाले त्यासाठी मी सरकारची आभारी आहे. मला आणि माझ्या मुलाला न्याय मिळेपर्यंत सर्वांनी मला असेच सहकार्य करा."


संबंधित बातम्या