BJP MLA Ganesh : भाजपचे आमदार गणेश नाईक यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. गणेश नाईक यांच्याविरोधात आता भारतीय दंड विधान संहिता 376 अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य महिला आयोगाच्या निर्देशानंतर हा गुन्हा दाखल झाला आहे. गणेश नाईक यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये पीडित महिलेने धक्कादायक आरोप लावले आहेत.
गणेश नाईक यांच्या बरोबर गेल्या 27 वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनमध्ये संबंध असल्याचा आरोप पीडित महिलेने केला होता. लिव्ह इन रिलेशनमधून मी एका मुलाला जन्म दिला असल्याचा आरोपही पीडित महिलेने केला होता. पोलिसांकडे तक्रार करूनही गुन्हा दाखल न केल्याने पीडितेने राज्य महिला आयोगाकडे धाव घेतली होती. राज्य महिला आयोगाच्या निर्देशानंतर पोलिसांनी गणेश नाईकांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला.
गणेश नाईकांविरोधातील FIR मध्ये काय म्हटले?
गणेश नाईक यांच्या बरोबर 1993 मध्ये ओळख झाली. यानंतर 1995 मध्ये गणेश नाईक आमदार असताना ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. प्रेमाचे संबंध आल्यानंतर गणेश नाईक यांच्या बरोबर शारिरीक संबंध आले. सन 2004 रोजी दोघांनी बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतला. या बाळाला पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याला माझे नाव देणार आणि दोघांनाही माझ्यासोबत ठेवणार असल्याचा शब्द नाईक यांनी दिला होता, असे पीडित महिलेने म्हटले. या पीडित महिलेला 30 नोव्हेंबर 2006 मध्ये गणेश नाईकांपासून गरोदर राहिली. नाईक यांनी गरोदरपणाचे पाच महिने झाल्यानंतर एप्रिल 2007 रोजी बाळतंपणासाठी अमेरिकेती न्यू जर्सी शहरात पाठवले. अमेरिकेत ऑगस्ट 2007 रोजी प्रसुती झाली. अमेरिकेतील प्रसुतीमुळे ग्रीन कार्ड मिळाले आणि त्यामुळे मुलाला स्वत:चे नाव दिले असल्याचे पीडित महिलेने सांगितले.
मुलगा झाल्यानंतर दोन महिन्यांनी गणेश नाईक हे स्वत: अमेरिका येथे आले होते. त्यानंतर आम्हाला नवी मुंबईत घेवून आले आणि नेरूळ येथे राहण्यासाठी फ्लॅट दिला असल्याचे पीडितेने पोलिसांना सांगितले.
सन 2007 ते 2017 पर्यंत गणेश नाईक आठवड्यातून तीन दिवस पीडितेच्या घरी येत होते. याच दरम्यान त्यांनी पीडितेच्या इच्छेविरोधात तिच्याशी शारिरीक संबंध प्रस्थापित केले. गेल्या काही वर्षापासून पीडितेकडून मुलाला वडिलांचे नाव द्यावे अशी मागणी केली असता नाईक यांनी रिव्हॅाल्वर दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी दिली असल्याचा आरोप पीडित महिलेने केला. गणेश नाईक यांच्या पासून झालेल्या मुलाची डीएनए चाचणी करून त्याला वडीलांचे नाव आणि हक्क मिळावा अशी मागणी पीडित महिलेने केली आहे.
गणेश नाईक यांच्या विरोधात सीबीडी पोलीस ठाणे आणि नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.