मुंबई : वाहनांच्या पार्किंगसाठी जागा शोधणं म्हणजे मुंबईत मोठं जिकरीचं काम. मात्र आता तुम्ही राहत असलेल्या परिसरातल्या हाऊसिंग सोसायटीसमोर तुमची गाडी पार्क करू शकता.


कारण सोसायट्यांसमोर वाहनं पार्क करण्यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या अर्जांना पोलिसांनी हिरवा कंदील दिला आहे. मुंबईतल्या फोर्ट, कुलाबा आणि कफ परेडमधल्या रहिवाशांनी इमारतीसमोर पार्किंग करण्यासाठी मुंबई पोलिसांना अर्ज केले होते.

अशा 29 अर्जांपैकी 25 अर्जांना मंजुरी देण्यात आली आहे. दरम्यान सोसायटीबाहेर गाडी पार्क करण्यासाठी तुम्हाला महिन्याला अठराशे रुपये मोजावे लागणार आहेत. त्यामुळे पार्किंगची समस्या सोडवण्यासाठी हा उपाय फायदेशीर ठरतो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सोसायटीसमोरील पे अँड पार्क योजना काय आहे?

  • प्रायोगिक तत्वावर ए वॉर्डमधील 29 पैकी 25 सोसायट्यांना परवानगी

  • सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत पार्किंगची मुभा

  • एका कारसाठी जास्तीत जास्त 1800 रुपये शुल्क

  • सोसायटीचा सुरक्षारक्षक पार्किंगवर नजर ठेवणार

  • यातून येणारी रक्कम रस्ते दुरुस्तीसाठी वापरली जाईल