मुंबई : दहशतवाद्यांविरोधात केलेल्या कारवाईसंदर्भात पूर्ण माहिती अद्याप हाती आलेली नाही. पोलिसांना त्यांच्या पद्धतीनं काम करु दिलं पाहिजे. पोलीस यंत्रणेत कोणताही राजकीय हस्तक्षेप नाही. महाराष्ट्र पोलीस कसून या प्रकरणाचा तपास करत आहेत, अशी प्रतिक्रिया गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या संपूर्ण घडामोडींच्या पार्श्वभूमीवर दिली आहे. 


दिलीप वळसे पाटील बोलताना म्हणाले की, "देशात विविध ठिकाणी घातपाताच्या कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या संशयावरुन काही संशयित व्यक्तींना दिल्ली पोलिसांनी अट केली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील एका व्यक्तीचा समावेश आहे. यासर्व प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या घटनेबाबत त्यांनी मला सर्व माहिती दिली आहे. अजून याप्रकरणाची सर्व माहिती मिळण्यासाठी वेळ लागणार आहे. हे प्रकरण नाजूक आहे. हा राजकारणाचा विषय नाही. पण तरि या संदर्भात सर्व वस्तुस्थिती सर्व जनतेला माहिती हवी, त्यासाठी महाराष्ट्र एटीएस प्रमुख विनित अग्रवाल त्यांच्या कार्यालयात दुपारी 3 वाजता माध्यमांशी संवाद साधून अधिक माहिती देतील."


"यामध्ये अपयश आहे असं मी म्हणणार नाही. यातले फार बारकावे मला सांगता येणार नाहीत. त्याचा तपासावर परिणाम होऊ शकतो. एटीएसचं या घटनेवर लक्ष आहे. पोलिसांना पोलिसांच्या् पद्धतीने तपास करू दिला पाहीजे. त्यातून सगळं सत्य सगळ्यांसमोर येईल.", असं गृहमंत्री म्हणाले. पुढे बोलताना दिलीप वळसे पाटील म्हणाले की, "आपणही इतर राज्यात जाऊन तशी कारवाई करतो. जर माहिती परिपक्व असेल आणि स्थानिक ठिकाणाहून कुणाला अटक करायची असेल. तर स्थानिक पोलिसांना अवगत केलं जातं. पण माहिती गोळा करत असताना थेट अटक करण्याचे अधिकार देखील पोलिसांना आहेत. त्याप्रमाणे त्यांनी कारवाई केलेली आहे."


"कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्हं उपस्थित करण्याआधी ज्या परिस्थितीतून आपण जात आहोत, त्या परिस्थितीत सर्वांनी पोलिसांना मदत करण्याची भूमिका घेतली पाहिजे. सरकारने काढलेल्या आदेशाच्या विरोधामध्ये आंदोलनं करण्यापेक्षा किंवा बाकिच्या काही गोष्टी करण्यापेक्षा सरकारला, पोलिसांना सहकार्य करण्याची भूमिका घेतली पाहिजे. पोलिसांना पूर्ण स्वातंत्र्य आहे. अजिबात त्यांना दुसऱ्या कोणत्या गोष्टींसाठी अडकून ठेवलेलं नाही.", आरोप करणाऱ्या भाजपला गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 


दरम्यान, दिल्ली पोलिसांनी सहा दहशतवाद्यांना अटक केली आहे. त्यापैकी दोघांनी पाकिस्तानात प्रशिक्षण घेतले होते, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतून दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे तर उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधून चौघांना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी एका दहशतवाद्याचं मुंबईतील सायन परिसरात वास्तव्य होतं, अशी धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. जान मोहम्मद अली शेख, असं अटक करण्यात आलेल्या मुंबईत वास्तव्यास असणाऱ्या दहशतवाद्याचं नाव आहे. महाराष्ट्रातील दहशतवादी विरोधी पथकानं काल जान मोहम्मदच्या घरी जाऊन तपास सुरु केला आहे. तसेच त्याच्यासोबत राहत असलेल्या साथीदारांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे. 


मुंबई लोकल दहशतवाद्यांच्या निशाण्यावर?


दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या 6 दहशतवाद्यांसंदर्भात एक मोठा खुलासा झाला आहे. मुंबई लोकल पुन्हा एकदा दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आली आहे. दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा मुंबई लोकलवर निशाणा साधण्याचा कट रचला होता. त्यांनी मुंबई लोकलची रेकी केली होती. असी धक्कादायक माहिती समोर येत आहे. तसेच घातपाताचा कट यशस्वी करण्यासाठी त्यांनी राज्यातील अनेक महत्त्वाची ठिकाणंही दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असल्याची माहिती मिळत आहे. तसेच हा कट यशस्वी करण्यासाठी अनेक ठिकाणी विस्फोटकं पोहोचवण्यात आली आहेत, असं दिल्ली पोलिसांच्या तपासात उघड झालं आहे. 


दिल्ली पोलिसांनी ज्या सहा दहशतवाद्यांना ताब्यात घेतलं, त्यांची चौकशी सुरु आहेत. चौकशी दरम्यान, एका दहशतवाद्यानं सांगितलं की, आम्ही मुंबई लोकलची संपूर्ण रेकी केली होती. यापूर्वी मुंबई लोकल अनेकदा दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आली आहे. मुंबई लोकलमध्ये यापूर्वी सीरिअल बॉम्बस्फोट झाले आहेत. त्यामुळे दहशतवाद्यांचा मुंबई लोकलची रेकी करण्यामागे नक्की काय हेतू होता? याबाबत तपासयंत्रणा आणखी तपास करत आहेत. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :