कल्याण : आपला मोबाईल हरवला किंवा चोरीला गेला, की तो परत मिळण्याची शक्यता अशी कमीच असते. मात्र उल्हासनगर परिमंडळ चारच्या पोलिसांनी असे हरवलेले आणि चोरीला गेलेले मोबाईल फोन्स शोधून ते मूळ मालकांना परत केले आहेत.
गेल्या वर्षभरात चोरीला गेलेले आणि हरवलेले असे एकूण 628 मोबाईल फोन्स पोलिसांनी जप्त केले होते. हे फोन पडून राहण्यापेक्षा मूळ मालकांना परत करण्याचे आदेश ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी दिले होते. त्यानुसार उल्हासनगरमध्ये एक छोटेखानी कार्यक्रम आयोजित करून पोलिसांनी हे सगळे मोबाईल मूळ मालकांना परत केले.
या मोबाईल फोन्सची किंमत थोडी-थोडकी नव्हे, तर तब्बल 72 लाख रुपये इतकी आहे. यात पोलिसांनी मोबाईल चोरीच्या 43 गुन्ह्यांचाही छडा लावला असून 50 मोबाईल चोरांना अटक केली आहे.
एकदा फोन हरवल्यानंतर तो परत मिळण्याची कुठलीही आशा नसताना पोलिसांनी फोन शोधून परत केल्यानं या फोन्सच्या मूळ मालकांना मात्र सुखद धक्का बसला आहे. या सर्वांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.