नालासोपारा (मुंबई) : एटीएम मशिन फोडून रक्कम चोरी करण्याचे प्रकार वाढताना दिसत आहेत आणि तेही शहरांमध्ये अशा प्रकारांची संख्या मोठी आहे. त्यातच मुंबईजवळील नालासोपाऱ्यातून अशीच एक घटना समोर आली आहे. मात्र पोलिसांच्या सजगतेमुळे एटीएम मशिन फोडू पाहणाऱ्या चोरांना पोलिसांनी रंगेहाथ पकडलं आहे.


नालासोपाऱ्यात रात्रीच्या वेळी शहरात गस्त घालणाऱ्या पोलिस पथकाने एक मोठी चोरी होण्यापासून रोखली. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत नालासोपारा पूर्वेकडील डॉन लेन येथील अॅक्सिस बॅंकेचं एटीएम मशिन फोडून आतील पैसे चोरत असताना, गस्तीवरील पोलिसांनी चोराला रंगेहाथ अटक केली.

विकास सेन (वय 23 वर्षे) असे या चोराचे नाव असून, बॅंकेच्या एटीएम मशिनकडे कुणीही सुरक्षारक्षक नसल्याचा फायदा उचलत आरोपी विकास हा एटीएम मशिनच्या केबीनमध्ये घुसला. आत शिरुन आरोपी विकासने मोठ्या चातुर्याने बॅंकेच्या सीसीटीव्हीची वायर तोडून टाकली आणि एटीएम मशिन फोडण्याचा प्रयत्न केला.

मात्र, रात्री गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या ही घटना लक्षात आली. पोलिसांनी तातडीने तिथे जाऊन चोराला रंगेहाथ ताब्यात घेतलं. पोलिसांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे नालासोपाऱ्यात एक मोठी चोरी होताना टळली.