Maharashtra Political Crisis : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय तपास यंत्रणाच्या दबावाला बळी पडून बंडखोरी केली असल्याचा दावा शिवसेनेच्या गोटातून करण्यात येत आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या दोन आमदार आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मागे केद्रींय तपास यंत्रणांचा ससेमिरा लागला आहे. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या या दोन  आमदारांविरोधात आरोपांची राळ उठवली होती. आता, शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांवर दबाव असल्याचा आरोप शिवसेनेने केला होता. या आरोपांबाबत तथ्य असावी का, याबाबत दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे. 


राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर सुरू असल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांच्याकडून सातत्याने सुरू होता. एकनाथ  शिंदे यांच्या बंडानंतर पुन्हा एकदा हा आरोप लावण्यात आला. सध्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेले आमदार प्रताप सरनाईक आणि यामिनी जाधव या केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. यामिनी जाधव यांचे पती यशवंत जाधव हे मुंबई महापालिकेचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आहेत. आयकर विभागाने जाधव दाम्पत्याची चौकशी केली होती.


प्रताप सरनाईक आणि त्यांच्या मुलांची चौकशी


काही महिन्यांपूर्वी ईडीने प्रताप सरनाईक आणि त्यांचा मुलगा विहंग यांचीही चौकशी केली होती. त्यानंतर ईडीने सरनाईक यांच्याशी संबंधित काही मालमत्ता जप्त केली होती. ईडीने घर आणि कार्यालये यांच्यावर छापा मारला होता. त्याचवेळेस विहंग यांना ताब्यात घेत त्यांची चौकशी करण्यात आली होती. या चौकशीनंतर त्यांना सोडण्यात आले होते. 


यशवंत जाधव आणि यामिनी जाधव यांच्यावर कारवाई 


काही महिन्यांपूर्वी आयकर विभागाने यशवंत जाधव यांच्या घरावर छापा मारला होता. जवळपास चार दिवस आयकर विभागाने जाधव यांच्या घरी ठिय्या मांडला होता. यावेळी त्यांनी काही कागदपत्रेही ताब्यात घेतली होती. त्यानंतर  यशवंत जाधव आणि यामिनी जाधव यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. जाधव यांनी बनावट कंपनीच्या आधारे आर्थिक व्यवहार केला असल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता. सध्या जाधव हे आयकर विभागाच्या रडारवर असून ईडीदेखील कारवाई करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या.