मुंबई : नवीन वर्षाचे स्वागत दारु पिऊन करणार असाल तर सावधान, कारण तुमच्यावर वाहतूक पोलिसांची करडी नजर राहणार आहे. ठाणे आयुक्तालय क्षेत्रात कडक पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. नववर्षाचे स्वागत करण्यासाठी सर्वत्र मोठ्या प्रमाणात पार्ट्या आयोजित केल्या जातात. नववर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेकजण लॉन, फार्महाउस, हॉल घेऊन जल्लोष करतात आणि त्यानंतर दारूच्या नशेत गाड्या चालवल्याने अनेक अपघात होवून नाहक बळी जातात.
यावर्षी देखील ठाण्यातील घोडबंदर रोड तसेच ठाण्याला लागून असलेल्या अनेक ठिकाणी अशा पार्ट्या आयोजित केल्या जाणार आहेत त्याच पार्श्वभूमीवर ठाणे पोलीस वाहतूक शाखेने कडक उपाययोजना केल्या आहेत. यावर्षी कोरोनाचा धोका लक्षात घेता संपूर्ण आयुक्तालय क्षेत्रात जागोजागी पोलीस कर्मचारी PPE किट घालून मद्यपींवर कारवाई करणार असल्याची माहिती वाहतूक पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे. 25 डिसेंबरपासून आत्तापर्यंत जवळपास 450 ड्रिंक अँड ड्राइव्ह केसेसची नोंद झाली आहे.
यावर्षी दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या व्यक्तीच्या सहप्रवाश्यांवर देखील कारवाई करणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली आहे. पार्टीमध्ये मद्यप्राशन केल्यास वाहनमालकांनी घरी जाण्यासाठी हॉटेल व्यवसायिकांनी पर्यायी व्यवस्था करावी अशी माहिती त्यांनी दिली. तर ज्यांनी ई चलानचा दंड भरलेला नव्हता अशा वाहनांवर कारवाई करून गेल्या 28 दिवसात जवळपास 3 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले आहे.