मुंबई: ताज हॉटेलजवळ घडलेल्या एका घटनेनं मुंबईला पुन्हा एकदा 26-11च्या घटनेची आठवण झाली. एका तरुणानं ताज हॉटेलच्या मागच्या बाजूला एक बॅग टाकून पळ काढला. त्यामुळं पोलिसांची धावपळ झाली.

 

बॅगेत नेमकं काय आहे याचा सुगावा लागत नसल्यानं पोलिसांनी अखेर नियंत्रित स्फोट घडवून आणला. पण त्यामुळे या परिसरात काही काळ भीतीचं वातावरण पसरलं होतं. स्वातंत्र्यदिन जवळ आल्यानं कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहेत. त्यामुळेच या बॅगची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

 

आज दुपारी अडीच्या दरम्यान एक तरुण ताज हॉटेलच्या अगदी जवळच असणाऱ्या किंग्ज फॅब्रीक या दुकानाजवळ बॅग ठेवून तिथून पळून गेला. ही घटना तेथील लोकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली.

 

पोलिसांनी ही बॅग पाहिली असता त्यामध्ये काही कपडे आढळून आले. मात्र, त्याचसोबत एक छोटी वस्तू सापडली. या वस्तूबाबत पोलिसांना शंका आल्यानं त्यांनी त्याचा नियंत्रित स्फोट घडवून आला. मात्र, या बॅगमध्ये कोणत्याही प्रकारची स्फोटकं नसल्याची माहिती समजते आहे. मात्र, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये. असं पोलिसांकडून आवाहन करण्यात आलं आहे.