मुंबई : मध्य रेल्वेपाठोपाठ मुंबईत पश्चिम रेल्वेची वाहतूकही विस्कळीत झाली आहे. मरिन लाईन्स स्टेशनजवळ ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे लोकलचा खोळंबा झाला आहे.

 
पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे कामावरुन घरी परतणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. जलद मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे.

 
सकाळच्या वेळात मध्य रेल्वेवर मोठा खोळंबा झाल्यानंतर त्याच दिवशी घडलेल्या प्रकारामुळे संताप व्यक्त केला जात आहे. मध्य रेल्वेच्या भिवपुरी रोड स्टेशनजवळ तांत्रिक बिघाड झाल्याने लोकल वाहतुकीचा बोजवारा उडाला.

 
बदलापूर स्टेशनवर पहाटे 5 वाजून 5 मिनिटांची लोकल सुमारे अर्धा तास न आल्याने, ताटकळलेल्या प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक झाला. प्रवाशांनी थेट ट्रॅकवर उतरुन संताप व्यक्त केला. या सर्व प्रकारामुळे मध्य रेल्वेची लोकल वाहतूक पूर्णत: कोलमडली.