ठाणे : सीडीआर लीक प्रकरणी महिला खासगी गुप्तहेर रजनी पंडित यांना 11 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ठाणे न्यायदंडाधिकाऱ्यांनी आज हे आदेश दिले आहेत. सीडीआर लीक केल्याप्रकरणी सखोल चौकशीसाठी पोलिसांनी रजनी पंडित यांच्या कोठडीची मागणी केली होती.
दरम्यान सीडीआर (कॉल डिटेल रेकॉर्ड) लीक प्रकरणात पोलिस अधिकाऱ्यांचाही सहभागाची माहिती समोर आली होती. ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी काल मंगळवारी एबीपी माझाशी बोलताना यासंदर्भात माहिती दिली.
सीडीआर लीक प्रकरणात अटकेत असलेले आरोपी पोलिसांकडून सीडीआर खरेदी करुन विक्री करत होते. यामध्ये इतर राज्यातील पोलिसांचा समावेश असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पोलिसांसह मोबाईल कंपन्यांचे काही अधिकारीही या रॅकेटमध्ये सहभागी असल्याची माहिती मिळाल्याचे परमबीर सिंह यांनी सांगितले.
मोबाईल कंपन्यांचे अधिकारीच थेट गुप्तहेरांना सीडीआर उपलब्ध करुन देत होते. यासंदर्भात चौकशी सुरु आहे. मात्र मोबाईल कंपन्या चौकशीला सहकार्य करत नाहीत, असा आरोप पोलिस आयुक्तांनी केला आहे. मात्र, मोबाईल कंपन्यांनी यापुढे चौकशीला सहकार्य न केल्यास त्यांच्याविरोधात गुन्हा दाख केला जाईल, असा इशारा आयुक्तांनी दिला आहे.
व्हीआयपी नंबरही समोर, ब्लॅकमेलिंगचा संशय
काल सीडीआर लीक प्रकरणात व्हीआयपी नंबरचे सीडीआर (कॉल डिटेल रेकॉर्ड) मिळवल्याची माहिती आरोपींच्या चौकशीतून उघड झाली होती. पोलिसांनी त्या दृष्टीनेही तपास सुरु केला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, या प्रकरणात समोर आलेल्या नावांमध्ये अभिनेते, राजकीय नेते आणि प्रतिष्ठित व्यक्ती असण्याची शक्यता आहे. या सीडीआरचा वापर ब्लॅकमेलिंगसाठी झाला असल्याचा संशय पोलिसांना आहे.
मला नाहक त्रास दिला जातोय : रजनी पंडित
मला नाहक त्रास दिला जात आहे, सगळ्या गोष्टी सोप्या आहेत असं म्हणत महिला खासगी गुप्तहेर रजनी पंडित यांनी आरोप फेटाळले आहेत. तसंच आपण कायद्याबाहेर जाऊन कोणतंही काम केलेलं नाही किंवा लपवाछपवीही केली नसल्याचा दावाही पंडित यांनी केला आहे.
सीडीआर पुरवणारा अजिंक्य नागरगोजे ताब्यात
सीडीआर लीक प्रकरणी अजिंक्य नागरगोजे याला ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्याने 111 सीडीआर पुरवल्याची माहिती आहे. अजिंक्य नागरगोजे ठाणे पोलिसांना सायबर एक्स्पर्ट म्हणून मदत करत होता. सूत्रांच्या माहितीनुसार त्याने हॅकिंगद्वारे पोलिसांच्या सायबर सेलचा एक्सेस मिळवला होता.
संबंधित बातम्या :
CDR लीक प्रकरण : व्हीआयपी नंबर समोर, ब्लॅकमेलिंगचा संशय
CDR लीक प्रकरण : व्होडाफोनसह 7 मोबाईल कंपन्या चौकशीच्या घेऱ्यात
कॉल डिटेल्स रेकॉर्डिंग लीक प्रकरणी महिला गुप्तहेर रजनी पंडित यांना अटक
महिला खाजगी गुप्तहेर रजनी पंडित यांना अटक