ठाणे : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला आणखी 4 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. खंडणी मागितल्याप्रकरणी इक्बाल कासकरला ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. इक्बाल कासकरच्या चौकशीत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.


इक्बाल कासकर आणि त्याच्या साथीदारांना आज ठाणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी न्यायालयाने इक्बालची पोलिस कोठडी 4 दिवसांनी वाढवली आहे.

इक्बालच्या अटकेनंतर डी कंपनीचे शूटर रातोरात अंडरग्राऊंड झाल्याची माहिती तपास यंत्रणांच्या चौकशीतून पुढे आली आहे. मुंबईतील संपूर्ण डी गँग इक्बालच्या अटकेनंतर हादरली आहे. खुद्द दाऊदनेदेखील भीतीपोटी पाकिस्तानातील ठिकाण बदलले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

याआधी इक्बालने महत्त्वाची माहिती आयबी आणि पोलिसांना दिली. यामध्ये पाकिस्तानातील कराचीमधील क्लिफ्टन भागातील दाऊदचे तीन पत्ते, दाऊदसोबतचा संपर्क यांसह महत्त्वाची माहिती इक्बालने आपल्या चौकशीत दिली. यापुढेही इक्बालच्या चौकशीत महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.