वसई-विरार : नालासोपाऱ्यात ट्रॅकवर साचलेल्या गुडघाभर पाण्यातून भरधाव ट्रेन नेल्याप्रकरणी दोघांवर कारवाई करण्यात आली आहे. विरार स्टेशन मास्तर आणि पी वे विभागाच्या अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई केली आहे.

ट्रॅकवर पाणी साचल्याने वेग कमी ठेवण्याची माहिती एक्स्प्रेस ट्रेनच्या लोको पायलटला न दिल्याने विरार स्टेशन मास्तर बिपीनकुमार सिंह आणि पी वे विभागाचे अधिकारी शेख अब्दुल रहीमवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?
20 सप्टेंबर रोजी मुंबईत जोरदार पावसाने हजरे लावली होती. परिणामी, लोकलच्या अनेक रेल्वे स्थानकांवर पाणी साचलं होतं. त्यापैकी नालासोपारा स्टेशनच्या ट्रॅकवर गुडघाभर पाणी साचलं होतं. दुपारी साडेबाराच्या सुमारास प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची गर्दी होती. त्याचवेळी गुडघाभर पाण्यातून लोको पायलटने भरधाव एक्स्प्रेस ट्रेन नेली. पण ज्यावेळी लोको पायलटने हा तुफानी कार्यक्रम केला, तेव्हा त्याने फलाटावरील लोकांना आंघोळ घातलीच परंतु ट्रेनमधील प्रवाशांचाही जीव धोक्यात घातला.

काय आहे नियम?
नियमानुसार जेव्हा खूप पाऊस असतो किंवा ट्रॅकवर पाणी साचलेलं असतं तेव्हा ट्रेनचा वेग किमान ठेवण्याच्या सूचना असतात. तशी स्टँडर्ड प्रॅक्टिसही रेल्वेत आहे. कारण पावसामुळे रेल्वे रुळावरुन गाडी घसरण्याची शक्यता जास्त असते.

पाहा व्हिडीओ