जुगाऱ्यांनी पोलीस ठाण्यासमोरुनच केलं पोलिसाचं अपहरण!
एबीपी माझा वेब टीम | 01 Jun 2016 04:03 AM (IST)
मीरारोड: मीरारोड येथे जुगाऱ्यांनी एका पोलीस काँस्टेबलचं अपहरण चक्क पोलीस ठाण्यासमोरुनच केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. सुरन शेट्टी, सुकेश कोटीयन, अरुण शेट्टी, आण्णा इंगळे अशी आरोपींची नाव आहेत. 28 मेला पोलिसांनी एका जुगार अड्ड्यावर छापा मारुन 20 जणांना अटक केली. त्याच्या दुसऱ्या दिवशी एक फॉरच्यूनर गाडी मिरा रोड पोलीस ठाण्याच्या समोर आली. या गाडीत जुगारी असल्याची माहिती एका व्यक्तीनं पोलीस कॉन्स्टेबल देवचंद जाधव यांना दिली. गाडीतील जुगारी पकडण्यासाठी गेलेल्या कॉन्स्टेबल जाधव यांनाच चौघांनी गाडीत बसवलं आणि त्यानंतर घोडबंदर येथील फाऊंटन हॉटेलच्या आवारात जाधव यांना सोडून देण्यात आलं. याप्रकरणी चार जणांवर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. चारही आरोपींना ठाणे कोर्टानं न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.