मीरारोड : मोबाईल आणि दुचाकी चोरणाऱ्या टीम-23 या टोळीतील काही जणांना पोलिसांनी थेट फेसबुकच्या मदतीने अटक केली आहे. ठाणे ग्रामीणच्या क्राईम ब्राँच टीमने या टोळीतील दोघांना अटक करुन त्यांच्याकडून 15 बाईक आणि दहा मोबाईल हस्तगत केले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून या टोळीने मीरारोड ते मुंबई परिसरातील अनेक मोबाईल आणि बाईक चोरल्या होत्या. त्यामुळे ही टोळी पोलिसांच्या हिट लिस्टवर होती. याच टोळक्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी देखील एक अनोखी शक्कल वापरली. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा फोटो मिळवून त्यांना फेसबुकच्या माध्यामातून शोधून काढलं आणि त्यांच्या मुसक्या आवळल्या.



२० ते २२ वयोगटातील या चोरट्यांनी आपल्या चैनीसाठी बाईक आणि मोबाईल चोरण्याच्या उद्देशाने टीम–२३ ही टोळी सुरु केली होती. सहा जणांच्या या टोळीत एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे.

शहरातील बाईक चोरी रोखण्यासाठी पोलिसांचं एक विशेष पथक स्थापन करण्यात आलं होतं. नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक बाईक चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. त्याच सीसीटीव्हीतील फोटोच्या आधार घेत पोलिसांनी फेसबुकच्या माध्यमातून चोरट्याचा फोटो शोधून काढला आणि शुभम सिंह या युवकाला अटक केली. त्याच्यासोबतच एका अल्पवयीन मुलालाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सध्या या टोळीच्या इतर साथीदारांचाही कसून शोध सुरु आहे.