विरार :  लोकल ट्रेनमध्ये भोंदूबाबांचे पोस्टर चिटकवणारी टोळी अटक करण्यात विरार रेल्वे पोलिसांना यश आलं आहे. लोकल ट्रेन मध्ये पोस्टर चिटकवणाऱ्या चौघांना रेल्वे  पोलिसांनी अटक केली आहे. मागील अनेक दिवसांपासून पोलीस त्यांच्या मागावर होते.

ही टोळी पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेच्या लोकलमध्ये बाबा-बुवांचे पोस्टर चिटकवण्याचे काम करत होते. रशीद अल्लाउद्दीन, शबिक इस्तीयाक महबूब अली, रहेमान कुरेशी अशी या आरोपींची नाव आहेत. हे सर्व नालासोपाऱ्यात राहत असून त्याच्याकडून 200 हून अधिक पोस्टर्स जप्त करण्यात आली आहेत. त्यांच्यावर अनेक पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल  आहे. यांची मोठी टोळी असून ती  मेरठमध्ये मोठ्या प्रमाणावर सक्रीय आहे.

जादूटोणा, वशीकरण, आर्थिक भरभराट, नोकरी व्यवसायात यश यांची 100 टक्के खात्री देणाऱ्या भोंदूबाबांच्या जाहिरातबाजीविरोधात रेल्वे सुरक्षा बलाने (आरपीएफ) मोहीम उघडली असल्याची माहिती आहे. लोकल डब्यात चिकटवण्यात येणाऱ्या विविध भोंदूबाबांच्या जाहिरातींविरोधात धडाक्यात कारवाई सुरू आहे. त्यात, मेरठमधील छापखान्यांपासून ते पोस्टर चिकटवणाऱ्यांचे संधान मोडून काढणाऱ्या प्रयत्नांनी वेग धरला आहे.