मुंबई : मी भारतात येऊ शकत नाही, त्यामुळे तपास अधिकाऱ्यांनी अँटिग्वात येऊन माझी चौकशी करावी. अथवा व्हिडीओ काँफरसिंगद्वारे माझी चौकशी करा, अशी मागणी पीएनबी घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सीनं मुंबई उच्च न्यायालयात केली आहे.


प्रकृती अस्वास्थामुळे डॉक्टरांनी लांबचा प्रवास करण्यास मनाई केली आहे. त्यामुळे मी तिथं येण्यापेक्षा तुम्हीच इथं या अशी मागणी चोक्सीनं तपासयंत्रणेकडे केली आहे.

पंजाब नॅशनल बँकेच्या गैरव्यवहारामध्ये प्रमुख आरोपी असलेल्या मेहुल चोक्‍सीच्यावतीनं सोमवारी हायकोर्टात हे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आहे. "ज्यावेळेस जानेवारीमध्ये पहिली तक्रार (29 जानेवारी 2018) सक्तवसुली संचालनालयाने दाखल केली त्याच्याआधीच (4 जानेवारी 2018) मी उपचारांसाठी भारताबाहेर आलो होतो. त्यामुळे तपास अधिकाऱ्यांना चुकवून किंवा चौकशी टाळण्यासाठी मी देशाबाहेर पळालो हा तपासयंत्रणेचा दावा चूक आहे", असं या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे.

तसेच "मला डायबेटीस, उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा त्रास असल्यामुळे माझी प्रकृती अत्यंत ढासळली आहे. माझ्यावर एंजिओग्राफी झाली असून अजूनही काही ब्लॉकेजेसबाबत उपचार सुरू आहेत. त्यामुळे सलग प्रवास करणे मला शक्‍य होणार नाही", असंही यात म्हटलेलं आहे.

जर का माझ्याविरोधात गुन्हा दाखल होणार आहे याची मला माहिती असती तर मी आधीच माझ्या करोडो रुपयांच्या मालमत्तेची व्यवस्था केली नसती का?, असा सवाल करत ईडीने आपली सुमारे 1869 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली असून अन्य 4 हजार कोटी रुपयांचे मौल्यवान सामान ताब्यात घेतले आहे, असा दावाही चोक्सीनं केला आहे.

संबंधित बातम्या

तीन महिन्यात परतण्याचं आश्वासन देऊनही मेहुल चोक्सी भारतात का परतला नाही?, हायकोर्टाचा सवाल


पीएनबी घोटाळा : मेहुल चोकसीची आणखी 1217 कोटींची मालमत्ता जप्त


फरारांच्या मुसक्या आवळण्यासाठी नव्या कायद्याची तरतूद


नीरव मोदीच्या 9 आलिशान कार जप्त, ईडीची कारवाई


मुंबई : पीएनबी घोटाळा : मेहुल चोक्सी आणि नीरव मोदीचं घर, कार्यलयांवर CBI चे छापे