मुंबई: पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणात भारतातून फरार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदीला पुन्हा भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. लंडनमधल्या हायकोर्टानं बुधवारी यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. त्यानुसार तब्बल 13 हजार 500 कोटींचा घोटाळा करणाऱ्या नीरव मोदीची भारतीय तपास यंत्रणांकडून आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी चौकशी होणार आहे.


नीरव मोदीला भारताच्या ताब्यात आणण्यात यावं, यासाठी लंडन हायकोर्टात भारताकडून सातत्यानं बाजू मांडण्यात येत होती. पण त्याविरोधात नीरव मोदीनं लंडन हायकोर्टात याचिकाही दाखल केली होती. पण लंडन हायकोर्टानं ही याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळं नीरव मोदीच्या मुसक्या आवळून त्याला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 


नीरव मोदीला भारताच्या ताब्यात देण्यासंदर्भात वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेट कोर्टानं फेब्रुवारी महिन्यातच निर्णय दिला होता. तेव्हापासून नीरव मोदी तुरुंगात होता. त्यानं या निर्णयाला आव्हान देणारी याचिका लंडन हायकोर्टात केली होती. 51 वर्षांच्या नीरव मोदीनं आपलं मानसिक स्वास्थ्य ठीक नसल्याचा दावा याचिकेत केला होता. त्याच आधारावर आपल्याला भारतात पाठवू नये, अशी मागणी त्यानं केली होती.


काय आहे प्रकरण? 


पंजाब नॅशनल बँकेला 13 हजार 400 कोटींचा गंडा घालून मेहुल चोक्सी आणि या घोटाळ्यातील प्रमुख आरोपी असलेला त्याचा भाचा नीरव मोदी आपल्या कुटुंबासह भारतातून पसार झाला. सीबीआयने जानेवारी 2018 मध्ये पहिला गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर ईडी, आयकर विभाग आणि इतर तपास यंत्रणांनी मोदी, मेहुल चोक्सी  आणि बँकेचे अधिकारी  यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. फायरस्टार इंटरनॅशनल लिमिटेड या समुहामध्ये फायरस्टोन ट्रेडिंग प्रा. लिमिचेड, एएननएम प्रा. लिमिटेड, एनडीएम एंटरप्रायजेस याशिवाय नीशल ट्रेडिंग अशा अनेक कंपन्याचा समावेश आहे.  


नीरव मोदी सध्या लंडनमधील तुरुंगात आहे. त्याला परत आणण्यासाठी भारत सरकार प्रयत्न करत आहे. ईडी नीरव मोदीच्या परदेशातील मालमत्ता ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहे. नीरव मोदीनं 2017 मध्ये त्याच्या कंपनी फायरस्टार डायमंड्सद्वारे आयकॉनिक रिदम हाऊस इमारत खरेदी केली होती. त्याचे हेरिटेज प्रॉपर्टीमध्ये रूपांतर करण्याची त्यांची योजना होती. पीएनबी घोटाळ्यातून मिळालेल्या पैशातून त्याने बहुतांश मालमत्ता खरेदी केल्याची माहिती मिळत आहे. 


महत्त्वाची बातमी :