उल्हासनगर (अजय शर्मा) : रेफ्युजी म्हणून किती दिवस रडत बसणार आहात? एकीचं बळ दाखवा आणि आता लढायला शिका. सामूहिकरित्या जीएसटी भरायला नकार द्या, मग बघा उद्धव ठाकरेच नव्हे, तर नरेंद्र मोदीही तुमच्याकडे येतील, असं आवाहन खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लहान भाऊ प्रल्हाद मोदी यांनी उल्हासनगरच्या व्यापाऱ्यांना केलं. उल्हासनगर ट्रेड असोसिएशनच्या वतीनं आयोजित व्यापाऱ्यांशी संवाद कार्यक्रमाला प्रल्हाद मोदी यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं.

Continues below advertisement

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लहान भाऊ प्रल्हाद मोदी हे ऑल इंडिया फेअर प्राईझ शॉप असोसिएशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत. मागील दोन वर्षात लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरं जावं लागलंय. अशात सरकारी पातळीवरून कुठलीही मदत मिळत नसल्यानं आपला आवाज केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी उल्हासनगर ट्रेड असोसिएशन या व्यापाऱ्यांच्या संघटनेनं प्रल्हाद मोदी यांना निमंत्रित केलं होतं. 

या कार्यक्रमात व्यापाऱ्यांनी आपल्या समस्या प्रल्हाद मोदी यांच्याकडे व्यक्त केल्या. तसंच केंद्र सरकारपर्यंत आपला आवाज पोहोचवण्याची मागणी केली. उल्हासनगर शहर हे निर्वासितांचं शहर असून या शहराला सरकारनं विशेष निधी द्यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. यावर बोलताना रेफ्युजी म्हणून किती दिवस रडणार आहात? आता लढायला शिका, असं आवाहन प्रल्हाद मोदी यांनी केलं. 

Continues below advertisement

तसंच तुमच्या शहराचा विकास होत नसेल आणि सरकारचं लक्ष वेधायचं असेल, तर सामूहिकपणे जीएसटी भरायला नकार द्या, मग पहा, उद्धव ठाकरेच नव्हे, तर नरेंद्र मोदीही तुमच्याकडे येतील, असं वक्तव्य प्रल्हाद मोदी यांनी केलं. तर यानंतर आम्ही जीएसटी केंद्राला भरतो, त्यामुळे आम्ही केंद्रालाच जाब विचारणार, अशी भूमिका उल्हासनगर ट्रेड असोसिएशनचे अध्यक्ष सुमित चक्रवर्ती यांनी स्पष्ट केली. 

लॉकडाऊनच्या काळात नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल उल्हासनगरात अनेक व्यापाऱ्यांवर पँडेमिक ऍक्टनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. इतर राज्यांनी हे गुन्हे मागे घेतले असून त्यामुळे महाराष्ट्रातही हे गुन्हे मागे घेतले जावेत, अशीही मागणी यावेळी करण्यात आली. या कार्यक्रमाला उल्हासनगरमधील सर्व व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. तर खुद्द पंतप्रधानांचे भाऊ येणार असल्यानं पोलिसांनी अतिशय कडेकोट सुरक्षाव्यवस्था ठेवली होती.