Mumbai : एमपीएससीच्या सर्वच परीक्षा मराठीत घेण्याचं नियोजन असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितलं आहे. एमपीएससीच्या अभियांत्रिकी परीक्षांचा सर्व अभ्यासक्रम मराठीत होणार असून सर्व तांत्रिक पदांच्या परीक्षा मराठीत घेणार असल्याचं नियोजन असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे . राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे . विधान परिषदेमध्ये सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षा मराठी मध्ये घेण्याविषयी प्रश्न उपस्थित केला होता .या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते . इतर सदस्यांकडून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामधील पदभरती पारदर्शकता आणि पेपरफुटीचे प्रश्न विचारण्यात आले . (MPSC)
काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस ?
राज्यातील अभियांत्रिकी आणि कृषी विषयक तांत्रिक पदांच्या परीक्षा मराठीमध्ये घेतल्या जात नसल्याचे सांगत अभियांत्रिकी विषयांची पुस्तके मराठीमध्ये उपलब्ध नसल्याने या परीक्षा इंग्रजी भाषेत घेतल्या जातात .पण आता लोकसेवा आयोगातील अभियांत्रिकी पदांसाठी होणाऱ्या परीक्षा मराठीत होणार आहेत .अभियांत्रिकी पदांच्या अभ्यासक्रमांची पुस्तकेही मराठीत उपलब्ध होणार असून इतर सर्व तांत्रिक पदांच्या स्पर्धा परीक्षा ही मराठीमध्ये घेण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले .
दरम्यान राज्य शासनाच्या 42 विभागांमध्ये अडीच लाखांहून अधिक पदे ही रिक्त आहेत .दरवर्षी 50 हजार पदांची मेगा भरती करण्यासाठी जाहिराती प्रसिद्ध केल्या जातात मात्र लोकसेवा आयोगाकडे मनुष्यबळ नसल्याने ही रिक्त पदे भरण्यासाठी वेळ लागतो .अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये अतिरिक्त 150 ते 200 पदे वाढवून देण्याची मागणी होत आहे .महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे मनुष्यबळ नसल्याने खाजगी कंपनीकडून परीक्षांचे नियोजन केले जात असल्याचे सांगत यात अपारदर्शकता पेपर फुटी आणि कॉपी तसेच मार्गांमध्ये तफावत असल्याचे गैरप्रकार वारंवार निदर्शनास येत आहेत .याबाबत विचारणा केली असता पेपर फुटी कॉपी मार्कांमधील तफावत हे प्रकार आणि खाजगी कंपनीकडून परीक्षांचे नियोजन करणे यांचा संबंध नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या उत्तरात सांगितले .