मुंबई : मुंबईत रस्त्यांवर आणि वर्दळीच्या ठिकाणी बेशिस्तपणे पार्किंग करत नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करा. तसेच यासंदर्भातील नियम आणि कायदे अधिक कठोर करण्याची आवश्यकता असल्याचं मत मुंबई उच्च न्यायालयानं व्यक्त केलं आहे. सीएसएमटी आणि चर्चगेटसारख्या कायम व्यस्त असलेल्या रेल्वे स्थानकांबाहेर जागा आखून दिलेली असतानाही बेशिस्तपणे पार्किंग करून दादागिरी करणा-या टॅक्सी चालकांबाबत मुंबई पोलीस आणि महापालिका प्रशासनानं काय उपाययोजना केल्या आहेत. यावर 10 डिसेंबरच्या पुढील सुनावणीत माहिती देण्याचे निर्देश हायकोर्टानं दिले आहेत.

सामाजिक कार्यकर्ता टेकचंद खानचंदानी यांनी मुंबईतील पार्किंगच्या समस्येबाबत दाखल केलेल्या जनहित याचिकेवर न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठापुढे सुनावणी सुरू आहे. मुंबई गर्दीच्या ठिकाणी बऱ्याचदा बेकायदेशीर आणि बेशिस्तपणे वाहनं उभी केली जातात. त्यामुळे मुंबईत ट्राफिकची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. याविरोध तक्रार देऊनही प्रशासन यावर कठोर कारवाई करताना दिसत नाही, असा आरोप या याचिकेतून करण्यात आला आहे.

या याचिकेची गंभीर दखल घेत हायकोर्टानं मुंबई पोलीस आणि पालिका प्रशासनाला आपली भुमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच टॅक्सी स्टॅण्डसाठी जागा निश्चित केलेली असतानाही बेकायदेशीर पिकअप पॉईंट तयार करणाऱ्या टॅक्सी चालकांविरूद्ध दिवसा तसेच रात्रीच्यावेळी काय उपाययोजना केल्या आहेत?, असा सवालही हायकोर्टानं प्रशासनाला विचारला आहे.