मुंबई : राज्यभरात सुरु असलेल्या मराठा मोर्चांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. सार्वजनिक संपत्तीचं नुकसान करणाऱ्या आंदोलकांवर कारवाई करण्याची मागणी या याचिकेतून केली गेली आहे.

शेतकरी द्वारकानाथ पाटील यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली असून अॅड. आशिष गिरी यांनी त्यांचं वकिलपत्र घेतलेलं आहे. राज्यभरात सुरु असलेल्या मराठा समाजाच्या मोर्चावर प्रतिबंध घालावा आणि सार्वजनिक संपत्तीची नासधूस करणाऱ्या आंदोलकांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

सर्व आंदोलकांना कलम 149 अंतर्गत नोटिसा बजावण्यात याव्यात, असंही याचिकेत म्हटलं आहे. हिंसा करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, हिंसक आंदोलन करणारे नेमके कोण याचा शोध घ्यावा, अशी मागणीही याचिकेत करण्यात आली आहे.

या याचिकेवर 13 ऑगस्टला मुंबई उच्च न्यायालयाच सुनावणी होणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेल्या मराठा क्रांती मोर्चाने आज म्हणजेच 9 ऑगस्ट रोजी 'महाराष्ट्र बंद'ची हाक दिली. या बंदमध्ये मुंबईचा समावेश असला, तरी नवी मुंबई आणि ठाण्यातील मराठा समाज सहभागी झालेला नव्हता.

मराठा समाजाला आरक्षण द्यावं, आरक्षण जाहीर होईपर्यंत मेगा भरती स्थगित करावी, कोपर्डी बलात्कारातील आरोपींना फाशी द्यावी या प्रमुख मागण्यात मराठा आंदोलकांच्या आहेत. त्यापैकी मेगा भरती स्थगित करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 5 ऑगस्ट रोजी केली.