मुंबई : अलिकडच्या काळात एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी मुंबई आणि बॉलिवूडला बदनाम करण्यासाठी बातम्या पेरल्या, आर्यन खानला आणि अरबाज मर्चंट यांना एनसीबीच्या कार्यालयात खेचत घेऊन जाणारे ते दोन व्यक्ती NCB चे अधिकारी नाहीत, ते भाजपशी संबंधित आहेत असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. भाजपचे  मनिष भानुशाली आणि केपी गोसावी त्या ठिकाणी कसे आले, त्यांचा या पार्टीशी काही संबंध आहे का याचं एनसीबीने द्यायला हवं अशी मागणीही त्यांनी केली. 


नवाब मलिक म्हणाले की, "एनसीबीने शनिवारी मुंबईतील क्रूझवर टाकलेल्या छाप्यात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आणि इतरांना अटक केली होती. त्या दिवशी आर्यन खानला एक व्यक्ती खेचत एनसीबीच्या ऑफिसमध्ये घेऊन जाताना फोटो व्हायरल होत होता. नंतर याच व्यक्तीने आर्यन खान सोबत सेल्फीही काढल्याचं व्हायरल झालं होतं. सुरुवातीला हा व्यक्ती एनसीबीचा अधिकारी असल्याचं सांगण्यात येत होतं. पण नंतर दिल्लीच्या एनसीबी कार्यालयाने हा व्यक्ती आपला अधिकारी वा कर्मचारी नसल्याचं स्पष्ट केलं."


या व्यक्तीचे नाव के.पी. गोसावी आहे आणि तो स्वत: प्रायव्हेट डिटेक्टिव्ह आहे असं सांगतो. त्यामुळे यामागे आंतरराष्ट्रीय रॅकेट असल्याचा दावा नवाब मलिकांनी केला आहे. 


नवाब मलिक पुढे म्हणाले की, "ड्रग बाळगल्याचा आरोप असलेल्या व्यक्तीसोबत तो दुसरा व्यक्ती कोण होता हे एनसीबीने जाहीर करावं.  दुसरा एक व्यक्ती, ज्याने मरुन शर्ट घातलेला होता आणि जो अरबाज मर्चंटला एनसीबीच्या कार्यालयात घेऊन जात होता तोही व्यक्ती एनसीबीचा अधिकारी नव्हता. त्याचं नाव मनिष भानुशाली असून तो भाजपाचा उपाध्यक्ष आहे."


य़ा मनिष भानुशालीचा फोटो पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच भाजपच्या अनेक मंत्री आणि नेत्यांसोबत आहेच. एनसीबीने दावा केला आहे की क्रूझवर त्यांनी छापा मारला. त्यावर मग माहिती देताना आठ ते दहा लोक असल्याचा दावा केला होता. त्यावेळी आठ लोकांना अटक केली होती. मग इतर दोन कोण होते हे एनसीबीने स्पष्ट करावे.   


नवाब मलिक म्हणाले की, "गेल्या 36 वर्षांच्या काळात एनसीबीवर कधीही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आला नाही. पण सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणानंतर एनसीबीचे कृत्य संशयास्पद आहे. त्यानंतर मुंबईत असलेल्या बॉलिवूडला ठरवून बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु झाला. मुंबईतील क्रूझवर टाकलेल्या छापेमारी याच्याशीच संबंधित आहे."



राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आरोप केलेले मनिष भानूशाली आणि के. पी. गोसावी नेमके आहेत? 


मनिष भानुशाली 
मनिष भानुशाली हा डोंबिवली एमआयडीसी परिसरात राहातो. तो व्यावसायिक असून भाजपचा सक्रिय कार्यकर्ता आहे. 2012 पर्यंत मनिष भाजपचा कल्याण जिल्हा उपाध्यक्ष होता. त्यानंतर त्याच्याकडे कोणतेही पद नसले तरी तो भाजपचा सक्रिय कार्यकर्ता आहे. मनिषचे भाजपच्या बड्या नेत्याशी थेट संबंध आहेत. फेसबुकवर त्याने अपलोड केलेल्या बड्या नेत्यांसोबतच्या फोटोवरून त्याची बड्या नेत्यांशी असलेली जवळीक दिसून येते. डोंबिवलिमध्ये राहणारा मनिष जास्त वेळ दिल्लीतच असतो. 


के पी गोसावी 
किरन गोसावी याची केपीजी ड्रीम्ज नावाची कंपनी आहे. याच्या कंपनीचे कार्यालय मुंबई आणि नवी मुंबई इथे आहे. याची कंपनी recruitment firm आहे. म्हणजेच देशात आणि परदेशात जॉब मिळवून देण्याचं काम के.पी. गोसावी करत असल्याचे म्हटलं जातं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार के. पी. गोसावी प्रायव्हेट डिटेकटिव्ह म्हणून काम करतो आणि त्याचे बड्या बड्या पोलीस अधिकाऱ्यांशा संपर्क आहे. 


2018 मध्ये पुण्यातील एका 22 वर्षीय तरुणाने के. पी. विरुद्ध गुन्हा दाखल केला होता. गोसावी याने मलेशिया इथे नोकरी लावून देतो म्हणून त्या मुलांकडून तीन लाख रुपये घेतले पण त्याला नोकरी दिली नाही असा आरोप होता. 


मनिष आणि के.पी गोसावी या दोघांचे एकत्रित बड्या मंत्री, नेत्यांसोबत फोटो आहेत. मनिष आणि के. पी. गोसावी त्या रात्री आरोपींसोबत एनसीबी कार्यालयात काय करते होते हा मोठी प्रश्न आहे.